मुंबई - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच दम भरला आहे. मुंडे साहेबांना काय झालं, हे मला माहित असेल तर ज्याने हे केलंय, त्याचा जीव घेण्याची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. मला कुठल्याही एजन्सीची गरज नाही. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेऊन माझा स्वतःचा जीव जागच्या जागी जाईल? असे म्हणत पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं.
मी दिल्लीपर्यंत जाऊन काम करु शकते. मी तुमचं नाव देशात करु शकते. मात्र, हा जिल्हा तुम्हाला सांभाळायचा आहे. या जिल्ह्याची जबाबदारी माझ्या बहिणीवर जेवढी आहे, तेवढी तुमच्यावर आहे. मुंडे साहेबांनी मला तुमच्या ओटीत घातलय, मी प्रितमताईला तुमच्या ओटीत टाकतेय. मी जिल्ह्याला भरपूर निधी दिलाय, त्या बदल्यात मी तुम्हाला मतं मागतेय. मतांसाठी मला नाक घासायला लावणार का, मतांसाठी मला हात पसरायला लावणार का ? असा प्रश्न ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांनी बीडमधील जनतेला विचारला. त्यानंतर, गोपीनाथ मुंडेंच्या मृत्युसंबंधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं.
पंकजा मुंडेची एवढी का भिती वाटतेय तुम्हाला, तुम्हाला माझ्या बापाच्या मृत्युचं राजकारण करायचंय. या राजकारणात तुम्हाला पंकजा मुंडेंचा राजीनामा हवाय ? पंकजाची एवढी भिती वाटते का तुम्हाला, असे म्हणत पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केलं. 'या साल्या लुच्चे लबाड लोक आहेत, मुंडे साहेबांचा मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे. अरे, मी मुंडे साहेबांची लेक आहे. मुंडे साहेबांना काय झालं, हे मला माहित असेल तर ज्याने हे केलंय, त्याचा जीव घेण्याची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. मला कुठल्याही एजन्सीची गरज नाही. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेऊन माझा स्वतःचा जीव जागच्या जागी जाईल? असा प्रश्नही पंकजा यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्युप्रकरणी ईव्हीएम हॅकरच्या आरोपानंतर, जयंत पाटील यांनी पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावरही, पंकजा यांनी प्रहार केलाय.
शोभतं हे जयंत पाटलांना? ते म्हणतात, पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. मुंडे साहेबांची हत्या झाली की नाही झाली, हा विषय तुमचा नाहीये महोदय. तुम्ही राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे बोलत आहात, तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे. तुम्हाला माहिती असली पाहिजे. तुम्हाला चार वर्षानंतर माझ्या बापाच्या मृत्युमध्ये राजकारण दिसतंय? आणि त्या राजकारणात तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे पंकजा मुंडेंचा राजीनामा पाहिजे? एवढी का पंकजा मुंडेंची भीती आहे? मी एक आवाज दिला तर मुंबई-दिल्लीपर्यंत माझे लोक यायला तयार आहेत. पण, माझ्या लोकांनी लाठ्या-काठ्या खाव्यात अशी यांची चाल आहे. पण, असल्या भूलथापांना बळी पडू नका. मी सीबीआय ऑफिसर नाही की हॅकर नाही. मी मुंडे साहेबांची लेक आहे. खालच्या पातळीवर घाणेरडं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही झालं नाही, असं म्हणत बीडमधील सभेत पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलच सुनावलं.