मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. तसेच, जीएसटीचा परतावा किंवा केंद्राकडून येणारा, वा मिळणारी मदत यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. आता, केंद्र सरकारनेजीएसटी परताव्याची रक्कम महाराष्ट्र सरकारला देऊ केली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक जीएसटी परतावा महाराष्ट्रालाच दिल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, राज्य सरकारच्या मंत्र्यांनाही आतातरी केंद्राकडे बोट दाखवू नका, असा टोलाही लगावला.
गेल्या अनेक दिवसांपासून जीएसटी परतावा देण्यावरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद निर्माण झाला होता. केंद्रात भाजपाचं सरकार असल्यामुळे या मुद्द्यावरुन राज्यातील महाविकास आघाडी विरोधी पक्ष भाजपाची कोंडी करत होतं, मात्र आता केंद्र सरकारने मार्च २०२० साठी राज्यांचा जीएसटी परतावा दिला आहे. त्यात सर्वाधित जीएसटी परतावा रक्कम महाराष्ट्राला मिळाली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या २०१९-२० जीएसटी परताव्याची एकूण रक्कम १ लाख ६५ हजार ३०२ कोटी इतकी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला १९ हजार २३३ कोटी सर्वाधिक रक्कम दिली आहे, त्यानंतर कर्नाटकला १८ हजार ६२८ कोटी रुपये जीएसटी परतावा म्हणून मिळाले आहेत. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांना टार्गेट केलं आहे.
देशामध्ये सर्वात जास्त जीएसटीचा मोबदला महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने स्वत:कडील 75 हजार कोटी रुपये जीएसटी परताव्यासाठी सर्व राज्यांना दिले. त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्राला जीएसटी परतावा देण्यात आलाय. त्याबद्दल, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि केंद्र सरकारचे आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, केंद्र सरकारवर आरोप लावणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनीही केंद्र सरकारचे आभार मानावेत. कारण, पीएम केअरमधूनही सर्वाधिक मदत महाराष्ट्राला झाली आहे. त्यामुळे, काहीही झालं की उठायचं अन् केंद्र सरकारविरोधात बोलायचं बंद कराव, असेही फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून केंद्राकडे जीएसटी परतावा देण्याची मागणी होत होती, अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्रही लिहिलं होतं, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता, त्यामुळे जीएसटी परताव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला केंद्राकडून १९ हजार २३३ कोटी इतकी भरघोस रक्कम मिळाली आहे.