मुंबई - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यापासून शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमधील वाकयुद्ध अधिकाधिक तीव्र होत चाललं आहे. त्यातच आता मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गीतापठण करण्यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. शाळांमध्ये गीतापठण घेण्याच्या भाजपा नगरसेविका योगिता कोळी केलेल्या मागणीला समाजवादी पक्षाने केलेल्या विरोधानंतर या मागणीच्या समर्थनार्थ नितेश राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भगवद् गीतापठणाच्या ठरावाची मागणी भारतीय जनता पक्षाच्या योगिता कोळी यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली होती. पण त्यावर लगेचच समाजवादी पक्षाकडून विरोध करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी या वादात उडी घेतली आहे. नितेश राणे म्हणाले की, आपल्याच देशात श्रीमद भगवद् गीतेच्या पठणाला विरोध होत असेल तर हे दुर्दैवी आहे. भगवद् गीतेच महत्व जगाने ओळखलं आहे. त्यास विरोध करण्यासारखं काहीच कारण नाही. विद्यार्थ्यांनी गीता पठण करायचं नाही तर मग फतवा ए आलमगीरी चे पठण करायचे का? असा संतप्त सवाल नितेश राणे यांनी विचारला.
नितेश राणे पुढे म्हणाले की, असे असले तरी मला खात्री आहे हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून उद्धवजी ठाकरे या भगवद् गीता पठणाच्या विरोधाच्या दबापुढे झुकणार नाहीत. लगेचच भगवद् गीता पठणाच्या मागणीला स्वीकारून महापालिकेतील संबंधिताना निर्देशित करतील, असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला.