Join us  

भाजप सत्तेत आल्यास घाेटाळ्यांची चाैकशी करू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 6:22 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केसीआर यांच्यावर टीका

हैदराबाद : सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घणाघाती टीका केली. केसीआर यांनी राज्यात हजाराे काेटी रुपयांचा घाेटाळा केल्याचा आराेप शाह यांनी केला. 

भाजपची सत्ता आल्यास सर्व घाेटाळ्यांची चाैकशी करण्यात येईल, असे शाह म्हणाले. राज्यात भाजप सत्ते आल्यास मुस्लिमांना दिलेले ४ टक्के आरक्षण रद्द करण्यात येईल आणि ओबीसी व अनुसूचित जमातींना लाभ देण्यात येईल, असे शाह म्हणाले.

आरमूर येथील प्रचारसभेत शाह बाेलत हाेते. ते म्हणाले, आपल्याविराेधात काहीच हाेणार नाही, असा विचार केसीआर यांनी करु नये. त्यांची वेळ संपली आहे. सर्व घाेटाळ्यांची चाैकशी भाजप सरकार करेल.

मंडल आयाेगावरून मायावतींचे टीकास्त्र

जातीनिहाय जनगणनेच्या मागणीवरून बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काॅंग्रेसवर टीकास्त्र साेडले. आज ते ही मागणी करीत आहेत. 

यापूर्वी काॅंग्रेसच्या सरकारांनी इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची मागणी मान्य केली नव्हती, असे मायावती म्हणाल्या. पेद्दापल्ली येथील प्रचारसभेत मायावती म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे काॅंग्रेसचेच देशात शासन हाेते. 

बसपने आंदाेलन केले आणि त्यानंतर व्ही. पी. सिंह सरकारने मंडल आयाेगाचा अहवाल लागू केला, हे ओबीसी समुदायाने लक्षात ठेवले पाहिजे, असे मायावती म्हणाल्या.

तेलंगणामध्ये सर्वाधिक बेराेजगारी : जयराम रमेश

देशात सर्वाधिक बेराेजगारीचा दर तेलंगणात असल्याची टीका काॅंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी बीआरएसवर केली. तरुणांना राेजगार मिळावा, हा तेलंगणा निर्मितीचा प्रमुख हेतू हाेता. ताे साध्य झाला नाही.

एका प्रकार परिषदेत बीआरएस सरकारवर टीका करताना रमेश म्हणाले, बेराेजगारीचा दर तेलंगणामध्ये ताे १५ टक्के असल्याचे जयराम रमेश म्हणाले. तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाणही राज्यात सर्वाधिक असल्याचेही रमेश म्हणाले.

 १० वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही. केवळ हैदराबादलाच तेलंगणा निर्मितीचा लाभ झाल्याचे रमेश म्हणाले.

टॅग्स :अमित शाहभाजपा