Join us

चेक बाऊन्स झाल्यास ८८५ रुपयांचा ‘करंट’, वीज ग्राहकांसाठी महावितरणचा नियम झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 9:04 AM

चेक बाऊन्स झाला तर महावितरणकडून ग्राहकाला तब्बल ८८५ रुपये भुर्दंड बसणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : लाइट बिल धनादेशाद्वारे (चेक) भरताना वीज ग्राहकांना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. चेक बाऊन्स झालाच तर ग्राहकाला तब्बल ८८५ रुपये भुर्दंड बसणार आहे. महावितरणने तसा निर्णय घेतला आहे.

महावितरणचे हजारो ग्राहक त्यांचे लाइट बिल चेकद्वारे भरतात. मात्र, त्यापैकी हजारो चेक दरमहा बाऊन्स होतात. त्यामुळे महावितरणला अनेकदा त्रास सहन करावा लागतो. त्यावर तोडगा म्हणून महावितरणने पुढील महिन्यापासून ज्या ग्राहकांचा चेक बाऊन्स होईल त्यांना ८८५ रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सबब चेक बाऊन्स झाल्यास ७५० रुपये प्रशासकीय शुल्क आणि अधिक जीएसटी १३५ रुपये असे ८८५ रुपये ग्राहकांना भुर्दंडरूपी भरावे लागतील.

कसा असावा चेक?

  • चेक स्थानिक बँकेचा असावा
  • चेकसोबत पावती स्थळप्रत जोडावी, स्टॅपल करू नये.
  • चेक पुढील तारखेचा नसावा.
  • बाऊन्स झालेल्या एकाच चेकद्वारे अनेक वीज बिलांचा भरणा केल्यास प्रत्येक बिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे.
  • चेकद्वारे वीज बिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे.
  • चेकवर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधित रक्कम नसणे आदी कारणांवरून चेक बाऊन्स होत आहेत. 
  • चेक दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. 
  • चेक दिल्यानंतर बिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी चेक रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच बिल भरणा ग्राह्य धरला जातो.

चेक बाऊन्स होणे हा दंडनीय अपराध आहे. चेक ही ग्राहकाने वापरलेली सुविधा आहे. त्यामुळे कुठल्याही कारणास्तव चेक बाऊन्स झाल्यास त्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. वीजग्राहकांनी चेकऐवजी ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करावा.- महावितरण

टॅग्स :वीज