जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य

By अतुल कुलकर्णी | Published: November 13, 2024 05:06 AM2024-11-13T05:06:43+5:302024-11-13T05:08:19+5:30

उद्धव ठाकरे यांना भावापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असा टोलाही राज यांनी लगावला.

If the enemies of the world come together we should discuss about coming together mns raj thackeray on shiv sena uddhav thackeray | जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य

जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क |

मुंबई :उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, पहिल्यांदा या प्रश्नावर एकत्र येण्यासाठी चर्चा तर व्हायला हवी ना, अशी भूमिका घेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ‘लोकमत’कडे पहिल्यांदा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उद्धव ठाकरे यांना भावापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असा टोलाही राज यांनी लगावला. दोन भाऊ एकत्र येण्याविषयी नेमकी झालेली चर्चा अशी -

प्रश्न : उद्धव ठाकरे आणि तुम्ही दोघे एकत्र यावे म्हणून अनेक प्रयत्न झाले. पण, त्यात कोणालाही यश का आले नाही?
उलट मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत.

प्रश्न : आतले आहेत की बाहेरचे..?
त्यात आतलेही आहेत, बाहेरचेही आहेत. सगळे जणच प्रयत्न करताहेत. माझ्याकडून मी अलर्ट असतो. अनेक गोष्टी माझ्या कानावर येतात. हा असे बोलला.. तो असे म्हणाला... अशा गोष्टी मला कळतात. पण, असल्या गोष्टी मी ऐकत नाही.

प्रश्न : पण असे व्हावे असे तुम्हाला वाटत नाही का..?
व्हावे असे वाटणे वेगळे. असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. समोरून त्यांच्याकडून काही लोक काही तरी बोलत असतात, सांगत असतात. करत असतात.

प्रश्न : तुम्ही दोघे आलात तर महाराष्ट्राचे चित्र बदलून जाईल असे सांगितले जाते...
त्यावर मी काय करणार.. आणि बोलणार तरी काय...?

प्रश्न : सुरुवात कुठूनच होत नाही... याचा अर्थ तुमची इच्छा नाही का..?
माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे... तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षांचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात. पण, उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते... भाऊ वाटत नाही... यावर माझ्याकडे बोलण्यासारखे काय असू शकेल.

प्रश्न : पण एकत्र येण्याला अडचण काय आहे..?
हिंदुत्ववादी शिवसेनेचा वर्सोव्याचा उमेदवार हारून खान असेल. त्यांचे दिंडोशीचे उमेदवार उर्दूतून पत्रके काढत असतील. काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून कुठेही बाळासाहेब ठाकरेंचे नावही घेतले जात नसेल, काँग्रेसची मफलर गळ्यात घालून उद्धव ठाकरे फिरणार असतील तर सगळ्याच गोष्टींचा व्यभिचार करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे. आणि बाकीच्या गोष्टींसाठी नाही... याला तुम्ही माझी खंत म्हणा किंवा अन्य काही, पण हे वास्तव आहे...

Web Title: If the enemies of the world come together we should discuss about coming together mns raj thackeray on shiv sena uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.