संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच, दिवाळी उत्सवही आला आहे. दिवे लावून आणि विद्युत रोषणाई करून हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवाळी निमित्त दर वर्षीप्रमाणेच याही वर्षी दादर शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिवाजी पार्कवर भव्य रोषणाई करण्यात आली आहे. मात्र यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आचारसंहितेचे कारण पुढे करत आक्षेप घेतला आहे.
दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता, 'हेच जर ईदची लायटिंग लागलेली असती आणि हिरवे कंदिल लावले असते, तर उबाठाने विरोध केला असता का? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटावर हल्ल चढवला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे? - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, "तुम्हाला (उबाठा) हिंदू सणांनचाच विरोध का आहे. हेच जर ईदची लायटिंग लागलेली असती आणि हिरवे कंदिल लावले असते, तर उबाठाने विरोध केला असता का? हा माझा प्रश्न आहे." तसेच, "जेव्हा आमचे सर्व हिंदू बांधव हिंदू सणाचा आनंद उपभोगत आहेत, मजा घेत आहेत, तर त्यात विरजन घालण्याचे काम तुम्ही का करत आहात?" असा सवालही त्यांनी ठाकरे गटाला केला.
विषय राहिला आचार संहितेचा, तर... -"विषय राहिला आचार संहितेचा, तर ते चूक आहे की बरोबर आहे, ते निवडणूक आयोग ठरवेल. मुळात तुमचा हिंदू सणांना विरोध का आहे? हे जर ईदची लायटिंग कुणी केली असती तर तुम्ही बांद्र्याला जाऊन विरोध केला असता का? हा माझा उबाठाला प्रश्न आहे आणि त्यांनी त्याचे उत्तर द्यायला हवे," असेही देशपांडे म्हणाले.