कोरोनाचा कहर झालाच तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:23 AM2023-04-11T03:23:03+5:302023-04-11T03:23:22+5:30

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार सोमवारी मुंबईसह राज्यभरात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.

If the havoc of corona happens | कोरोनाचा कहर झालाच तर...

कोरोनाचा कहर झालाच तर...

googlenewsNext

मुंबई :

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार सोमवारी मुंबईसह राज्यभरात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जे. जे., कामा आणि सेंट जॉर्जेस या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यास तत्परतेने त्यास कसा प्रतिसाद देता येईल, याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. या तीनही रुग्णालयांनी ॲम्ब्युलन्सने रुग्ण आल्यानंतर त्याला दाखल करून घेण्यासाठीची पद्धत कशी असावी, याची रंगीत तालीमही यावेळी करण्यात आली. तीनही रुग्णालयांनी मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पाडले. 

सेंट जॉर्जेस रुग्णलयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले की, आम्ही तीन पद्धतींच्या रुग्णांना दाखल करून घेण्याचे मॉक ड्रिल केले. त्यामध्ये एखादा पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यासाठी रुग्णलयात आला तर त्याला कशा पद्धतीने दाखल करता येईल याचे प्रात्यक्षिक केले. त्यासोबत एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे तर तातडीने या रुग्णाला ओपीडीमध्ये तपासून कशा पद्धतीने बेड देता येईल याबाबतची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये केसपेपर काढण्यापासून ते रुग्ण रुग्णालयात दाखल करेपर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना सामावून घेण्यात आले होते. 

कोरोनाबाधित लहान मुलांसाठी खास आमच्या रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्यावेळी आम्ही २४ लहान मुलांना उपचार दिले होते. या आजच्या मॉक ड्रिल मध्ये रुग्ण रुग्णालयात आल्यानंतरचा प्रोटोकॉल कसा असावा यावर भर दिला. तसेच ऑक्सिजनचा साठा पुरेसा प्रमाणात आहे का, हे पाहण्यात आले. सध्या सर्व कर्मचाऱ्यांना या रुग्णाच्या भरती प्रक्रियेत काय करावे, याचे बऱ्यापैकी ज्ञान प्राप्त झाले.
- डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय

आम्ही आजच्या मॉक ड्रिलमध्ये कुठलाही रुग्ण ॲम्ब्युलन्समधून उपचारासाठी आला तर त्याची तत्काळ चाचणी करून त्याला रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवून त्या ठिकाणी त्याला अत्यावश्यक उपचार कसे मिळतील याची पाहणी केली. तसेच जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या रुग्णास महिला आणि लहान मूल असेल तर कामा रुग्णालयात पाठविण्याची आणि प्रौढ असेल तर सेंट जॉर्जेस रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था कशी करण्यात येईल याचे मॉक ड्रिल आज झाले. भविष्यात जर रुग्णसंख्या अधिक झाली तर वरिष्ठाच्या सूचनेप्रमाणे या रुग्णालयात काही व्यवस्था करावी लागली तर त्याही तयारीही आम्ही ठेवली आहे.
- डॉ. संजय सुरासे, अधीक्षक, सर जे. जे. रुग्णालय

Web Title: If the havoc of corona happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.