हॉर्न वाजवला तर पोलीस घेणार परीक्षा, आयुक्तांची नवी शक्कल; दंडही ठोठावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:46 AM2022-04-11T05:46:04+5:302022-04-11T05:46:25+5:30
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यातच आता विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्तांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
मनीषा म्हात्रे
मुंबई :
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यातच आता विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्तांनी अनोखी शक्कल लढवली आहे. आता सतत हॉर्न वाजविणाऱ्यांना दंडाबरोबरच तीन तास पोलीस चौकीत बसवून वाहतूक नियमांचे धडे गिरवावे लागणार आहे. एवढ्यावरच न थांबता याकडे त्यांनी गांभीर्याने ऐकले की नाही यासाठी त्यांची परीक्षाही घेण्यात येणार आहे.
संजय पांडे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे आठवड्यात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. आयुक्तांनी सुरुवातीला वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त चालकांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. यामध्ये चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या बरोबर, विनाहेल्मेट, अवैध पार्किंग करणाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, मुंबईच्या गर्दीत लवकर जाण्याच्या घाईत सतत विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा आयुक्तांनी यापूर्वीही दिला होता.
यातच, सतत हॉर्न वाजविणाऱ्याला आधी दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला जवळच्या वाहतूक चौकीत बसवून तीन तास वाहतूक नियमांचे धडे देण्यात येणार आहे. त्यांनी हे व्यवस्थित ऐकले की नाही हे पाहण्यासाठी त्यांची परीक्षाही पोलीस घेणार आहे. त्यात, नापास झाल्यास त्यांना पुन्हा हे तीन तास ऐकावे लागणार असल्याचे आयुक्तांनी फेसबुक लाईव्ह द्वारे सांगितले. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामधून कुणाचीही सुटका होणार नाही. त्यामुळे वेळीच सावध होण्याचा इशारा आयुक्तांनी पुन्हा दिला आहे.
रात्री अपरात्री रस्ते मोकळे असतानाही विनाकारण सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिकांवरही कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहे. त्यांनाही आयुक्तांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान पडणार महागात
-सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यामुळे अनेकांना फटका बसत आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना पोलीस कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.
- शक्यतो सार्वजनिक धूम्रपान करणे टाळा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
- येत्या दिवसांत कारवाईचा वेग दिसून येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
मालमत्तेसंबंधित तक्रारींचीही दखल
मालमत्तेसंबंधित दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये सर्वसामान्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे मालमत्तेसंबंधित प्रकरणाचीही गंभीर दाखल घेणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे.
हुक्का पार्लरवरही कारवाई
ड्रग्ज मोहिमेपाठोपाठ हुक्का पार्लरही आयुक्तांच्या रडारवर आल्या असून, त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांच्या पथकाकडून गस्त वाढवून अशा हुक्का पार्लरवर छापा कारवाई करण्यात येत आहे.