Join us

मुलाखती तर झाल्या, नियुक्ती कधी करणार ? मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रकांना मिळेना मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 11:57 AM

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी सप्टेंबर अखेरीस उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत.

मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी सप्टेंबर अखेरीस उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. मात्र, याला दहा दिवस उलटूनही संचालकांची नियुक्ती होत नसल्याने युवा सेनेने विद्यापीठ प्रशासनाला याविषयी जाब विचारला आहे.

संचालक पदाची नियुक्ती प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, परिणामी कायमच ढिसाळ नियोजन दिसून येते. नियुक्तीला लागणारा विलंब राजकीय हेतूने तर नाही, असा सवाल ठाकरे गटाच्या युवा सेनेने उपस्थित केला आहे. याबाबत युवा सेनेने मुंबई विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले आहे.

विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभारात कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या खालोखाल असलेल्या कुलसचिव पदाच्या बरोबरीने विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक हे पद महत्त्वाचे मानले जाते.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाच्या नियुक्तीचा मुहूर्त कधी, असा सवाल आता विद्यापीठाला माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे.

 या पत्रानुसार, कायमस्वरुपी हे पद तातडीने भरावे, अशी मागणी होत असताना उशीर का केला जात आहे, असे म्हटले आहे. विद्यापीठात दरवर्षी वाढणारी नवी महाविद्यालये, लाखोंच्या घरात असलेली विद्यार्थी संख्या, नवीन शैक्षणिक व परीक्षा पॅटर्न, अपुरी कर्मचारी संख्या यामुळे हा विभाग नेहमी चर्चेत असतो. अनेकदा परीक्षा विभागातील अनागोंदी कारभार आणि ढिसाळ कारभार पाहायला मिळतो.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी अर्ज दाखल होऊन मुलाखती झाल्यानंतर कायमस्वरूपी परीक्षा नियंत्रक पदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुलाखतीनंतर सात दिवस झाले तरी पदनियुक्तीची घोषणा नसल्याने सिनेट निवडणुकीबाबत जे घडले ते पुन्हा होऊ नये, असेही म्हटले आहे.