महापौर बंगल्याला वाळवी नाही, तर काय लागले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:23 IST2025-01-21T13:23:14+5:302025-01-21T13:23:40+5:30
Mumbai News: महापौरांच्या निवासस्थानाचा दोन वर्षांपासून वापर होत नसल्याने महापालिकेने डागडुजी सुरू केली आहे. महापौर बंगल्याला वाळवी लागली नसून नियमित काम करण्यात येत असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला.

महापौर बंगल्याला वाळवी नाही, तर काय लागले?
मुंबई - महापौरांच्या निवासस्थानाचा दोन वर्षांपासून वापर होत नसल्याने महापालिकेने डागडुजी सुरू केली आहे. महापौर बंगल्याला वाळवी लागली नसून नियमित काम करण्यात येत असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र, ‘लोकमत’ने ऑन द स्पॉट जाऊन केलेल्या पाहणीत निवासस्थानाच्या छताला वाळवी लागल्याचे दिसून आले.
भायखळ्यातील राणीबागेच्या आवारात असलेल्या महापौर बंगल्याची डागडुजी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेवर प्रशासक नेमल्यानंतर या बंगल्याचा वापर होत नसल्याने छताला वाळवी लागली आहे. त्यामुळे वाळवी प्रतिरोधक कामांबरोबरच संरचनात्मक दुरुस्ती तसेच अन्य कामे केली जाणार आहेत. या कामासाठी निविदाही काढण्यात आली असून जे. पी. इन्फ्रा कंपनीला काम सोपवण्यात आले आहे. हा बंगला महापालिकेच्या हेरिटेज विभागाच्या अखत्यारित येतो.
६५ लाखांचा खर्च : सागवान लाकडाची रचना असलेला महापौर बंगला सुमारे सहा हजार चौरस फुटांचा आहे. मात्र, बंगल्याच्या छतासाठी काही ठिकाणी प्लायवूडचा वापर करण्यात आला होता. त्याला आता वाळवी लागली असून काही भाग जीर्ण झाला आहे. त्या ठिकाणी सागवान लाकडाचा वापर करून दुरुस्ती सुरू आहेत. तसेच मंगलौरी कौलांच्याखाली असलेले प्लायवूड वाळवी आणि पावसाच्या पाण्यामुळे जीर्ण झाले असून तेही बदलण्यात येत आहे. यासाठी ६५ लाखांचा खर्च येणार आहे.
ही तर नियमित दुरुस्ती!
महापालिका प्रशासनाने बंगल्याच्या दुरुस्तीची आणि रंगकामाची निविदा काढून काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महापौर बंगल्याच्या छताला वाळवी लागली म्हणून काम करण्यात येत नाही. हे नियमित काम आहे, कुठेही वाळवी लागलेली नाही. तसेच हे काम सहा महिन्यांत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. डागडुजीसह रंगकाम आणि पॉलिशिंगची कामे, वाळवी प्रतिरोधक कामेही केली जाणार आहेत, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.