महापालिकेची नालेसफाई दिखावा तर कचऱ्याने भरले नाले
By धीरज परब | Published: June 26, 2023 10:45 PM2023-06-26T22:45:09+5:302023-06-26T22:45:19+5:30
अतिक्रमणे व भराव काढले नाहीतच उलट वाढले
मीरारोड - मीरा भाईंदर शहर पहिल्याच पावसात जलमय झाल्याने पालिकेच्या भोंगळ कारभारावर टीकेची झोड उठत असतानाच नाले सफाई नीट झालीच नसल्याचे सांगत अनेक नाले कचऱ्याने भरले . तर नाले , खाड्या तीळ बेकायदा भराव व अतिक्रमणे हटवली नाहीच उलट त्यांना संरक्षण देण्याचा काम अधिकाऱ्यांनी केल्याचे आरोप होत आहेत .
सुमारे सव्वापाच कोटींची नालेसफाई हि केवळ दिखाव्या पुरती झाली असून नाले व खाड्या मधील गाळ आणि कचरा पूर्णपणे काढलाच गेला नाही . अंतर्गत नाले देखील योग्यरीत्या साफ केले गेले नाहीत . पहिल्या पावसातच शहरातील अनेक नाले - खाड्या नाले कचऱ्याने भरल्याचे दिसून आले . काशीमीराच्या वेस्टर्न पार्क जवळील मोठा नाला हा गाळ व झुडपांनी भरला आहे . तर भाईंदरच्या गणेश देवल नगर - बजरंग नगर मधील नाला कचऱ्याने जाम आहे . अंतर्गत नाले देखील कचऱ्याने भरल्याने पाणी तुंबले असल्याचे आरोप लोकांनी केले .
नाले , खाड्या, नैसर्गिक प्रवाहातील बेकायदा भराव व अतिक्रमणे काढून मार्ग मोकळे करण्या कडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण डोळेझाक केली . आयुक्त दिलीप ढोले यांनी वारंवार अतिक्रमण हटवा सांगून देखील अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली .
भाईंदरच्या सुभाषचन्द्र बोस मैदान समोरील भाग ते मुर्धा खाडी परिसराची उपायुक्त रवी पवार यांनी गेल्या वर्षी तत्कालीन सभापती पंकज पांडेय यांच्या मागणीवरून पाहणी करून देखील तेथील भराव व अतिक्रमण हटले नाहीच उलट नव्याने बांधकाम झाल्याचे समोर आले आहे .
शहर पहिल्याच पावसात पाण्याखाली जाण्यास मुख्यत्वे सार्वजनिक आरोग्य विभाग जबाबदार आहे . त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख रामभावन शर्मा , मनसेचे हेमंत सावंत आदींनी केली आहे .