Join us  

CoronaVirus: कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत; निर्बंध अन् 'मास्कसक्ती'बाबत विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 3:16 PM

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणार, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

मुंबई- राज्यात रविवारी १ हजार ४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून सातत्याने दैनंदिन वाढ होत असल्याचे सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. याचपार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

आज दुपारी ४ वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, मास्कसक्ती आणि आगामी राज्यसभेची निवडणुक या विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत निर्बंधांवर भाष्य केलं आहे. 

राज्यातील सध्याची कोरोना रुग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत आहेत. तूर्तास तरी मास्कसक्ती नाही, मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर मास्कसक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत असल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबईत गेल्या ४ महिन्याचा रेकॉर्ड मोडत शहरात हजाराच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मागील २४ तासांत ९६१ रुग्ण सापडले आहेत. तर कोरोना महामारीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात ३७४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 

लसीकरण आणि बूस्टर डोसवर भर-

बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार म्हणाले की, कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईत १ जून ते ३१ जुलै या कालावधीत 'हर घर दस्तक' मोहीम राबविण्यात येत आहे. बीएमसी १२ ते १४ व १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांना लसीकरण करेल. यासोबतच वृद्धाश्रम आणि इतर ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षे आणि त्यावरील) बूस्टर डोस दिला जाईल. या मोहिमेत बीएमसीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेटी दिल्या जात आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसविजय वडेट्टीवारमहाराष्ट्र विकास आघाडी