Join us

परवानग्यांची संख्या कमी केली, तर...; ‘लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४’ मध्ये बिल्डरांनी व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 11:01 AM

मुंबई क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल म्हणाले, मुंबईमध्ये लाखो लोक येतात.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांसह मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मुंबईमध्ये बहुतांशी प्रकल्प पुनर्विकास प्रकल्प असून, ते उभे करताना खूप साऱ्या परवानग्या मिळवाव्या लागतात. त्या कमी करण्याबाबत विचार केला तर प्रकल्पांना होणारा विलंब कमी होण्यास मदत होईल आणि गृहनिर्माण प्रकल्प वेळेत, लवकर पूर्ण होतील, अशी भावना बांधकाम व्यावसायिकांनी लोकमत आणि रुस्तोगी इस्टेटस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४’ मधील चर्चासत्रात व्यक्त केली.

मुंबई क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल म्हणाले, मुंबईमध्ये लाखो लोक येतात. प्रत्येकाला घर हवे असते. मुंबई जगाची अर्थव्यवस्था आहे. मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. गृहनिर्माण प्रकल्पासाठी खूप परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे बांधकामाला विलंब होतो. गृहनिर्माण प्रकल्प लांबणीवर पडतो. पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी परवानग्यांबाबत थोडा विचार केला तर प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. परवडणारी घरेदेखील प्रत्येकाला मिळाली पाहिजेत. परवडणाऱ्या घरांची व्याख्या निश्चित केली पाहिजे. सरकार पायाभूत सेवा-सुविधांवर भर देत आहे, याचा आनंदच आहे. याचा गृहनिर्माण क्षेत्रालाही फायदा होणार आहे.

ठाणे क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता म्हणाले, गृहनिर्माण क्षेत्रात अनेक बिकट समस्या होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये या समस्या निकाली निघत आहेत. विशेषतः महारेरासारखे प्राधिकरण काम करत असल्याने प्रश्न निकाली निघण्यास मदत होत आहे. कामात सुसूत्रता आल्याने तक्रारी कमी होण्यास मदत होत आहे.

पॅराडाईज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भतिजा म्हणाले, नवी मुंबईमध्ये विमानतळ होणार, अशी चर्चा दहा वर्षांपासून सुरू होती. आज हे विमानतळ आकारास येत आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांना स्वप्नातले घर नवी मुंबईत दिसत आहे. यापूर्वी लोकांना पनवेल, खारघर, वाशी माहिती नव्हते. आता येथे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. पायाभूत सेवासुविधा चांगल्या मिळत आहेत.

रिजन्सी इस्पातचे संचालक अमित खेमानी म्हणाले, कच्च्या मालाच्या किमती खूप आहेत. स्टीलच्या किमती जास्त आहेत. स्टीलच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. तर व्हर्सेटाईल हाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक आनंद ठक्कर, रुस्तोगी इस्टेटस् प्रायव्हेट लिमिटेडचे सीएमडी संजय गुप्ता, बोरगावकर ग्रुपचे सीएमडी संजय बोरगावकर, सॉलिसिस लेक्सचे व्यवस्थापकीय सहयोगी अमित मेहता यांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. जीव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

नवी मुंबईत घर घेण्यास उत्सुक-      गृहनिर्माण क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिकांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून बांधकाम व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. -      राज्य सरकार पायाभूत सेवा-सुविधा निर्माण करण्यावर भर देत असल्याने गृहनिर्माण क्षेत्राला उभारी मिळत असल्याचे मत बांधकाम व्यवसायिकांनी व्यक्त केले. -      परवडणाऱ्या घरांवर भर देतानाच नवी मुंबईमध्ये उभे राहणारे विमानतळ आणि अटल सेतूमुळे नवी मुंबईचा मेक ओव्हर होत आहे. नवी मुंबईची आता आणखी नव्याने ओळख होत आहे. लोक नवी मुंबईमध्ये घर घेण्यास उत्सुक आहेत, याकडे चर्चासत्रामध्ये लक्ष वेधण्यात आले. 

टॅग्स :मुंबई