आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितल्यास मी समर्थ- अमोल कीर्तिकर
By मनोहर कुंभेजकर | Published: November 7, 2023 02:28 PM2023-11-07T14:28:40+5:302023-11-07T14:29:09+5:30
"मी पक्षाचा निष्ठावान शिवसैनिक", वडिलांविरोधातच थोपटले दंड?
मनोहर कुंभेजकर, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात माझी उमेदवारी अजून जाहिर झालेली नाही.मी या मतदार संघात जोमाने कामाला सुरुवात केली असून मतदार संघाची चांगली बांधणी केली आहे. मी या मतदार संघात आमंत्रण आलेल्या प्रत्येक कार्यक्रमांना आवर्जून हजर असतो. वडील खासदार गजानन कीर्तिकर यांनी ११ नोव्हेंबर रोजी शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा मी तिकडे गेलो नाही. कारण सुरूवातीपासून मी पक्षाचा निष्ठावान शिवसैनिक असून मला पक्षाने उपनेतेपद देखील दिले आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास पक्षाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यास ते जी जबाबदारी मला देतील ती पेलण्यास मी समर्थ आहे. माझ्या समोर कोण उमेदवार आहे त्याचा मला फरक पडत नाही, असे अमोल किर्तीकरांनी लोकमतला स्पष्ट केले.
दि १८ मे रोजी मातोश्रीत झालेल्या बैठकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकारांना साथ द्या! असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबीरात केले होते. त्यामुळे या मतदार संघात वडील गजानन कीर्तिकर विरोधात मुलगा अमोल कीर्तिकर यांच्यात लढत होणार का?तर सिद्धेश कदम हे शिंदे गटाचे येथे उमेदवार असतील का? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि येथील मतदार संघात सुरू झाली आहे.
ठाकरे गटातून आपले चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार सांघातून उमेदवारी जाहिर झाली यावर भाष्य करतांना खासदार कीर्तिकर म्हणाले की,मी येथून निवडणूक लढवणार असल्याने तू माझ्या विरोधात निवडणूक लढवायची नाही, प्रचार करायचा नाही,तू हा मतदार संघ सोडून महाराष्ट्रात इतर कुठेही निवडणूक लढव,तिकडे मी प्रचार करणार नाही,माझ्याकडे तू प्रचार करू नकोस असे
त्याला आपण सांगितल्याचे खासदार कीर्तिकर यांनी लोकमतला सांगितले.
गजानन कीर्तिकर- रामदास कदम यांच्यात उफाळला वाद
दरम्यान लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी उरला असतांनाच शिंदे गटातील धुसफूस समोर आली आहे. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गटाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर आणि शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्यात वाद उफाळला आला आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार गजानन कीर्तिकर यांचं वय झालं आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर उभे राहिले नाहीत, तर आपले चिरंजीव सिद्धेश कदम उमेदवारी मागतील, असं विधान शिवसेना ( शिंदे गट ) नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी नुकतेच दापोलीत केलं होतं. याला खासदार गजानन कीर्तिकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या दहा वर्षात उत्तर-पश्चिम मतदारसंघात मी कामे केली आहे. ही जागा पुन्हा निवडून आणायची आहे. त्यामुळे निवडणूक लढण्याचा मी ठाम निर्णय घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीत साडेतीन लाखांहून अधिक मतांनी निवडून येऊ शकतो,” असा ठाम विश्वास गजानन कीर्तिकरांनी लोकमतकडे व्यक्त केला.
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात मी १०० कोटींची विकासकामे केली आहेत. पक्षात काही माणसं आली असून नेतृत्व करतात. त्यांचे काही छुपे अजेंडे असू शकतात. पण, एकाच घरात आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम घरात दोन भावांना तिकीट देता येते का? पक्षानं तिकीट द्यायचं ठरवलं, तर त्याला मी विरोध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पक्षाला मला तिकीट द्यायचं नसेल, तर कुठल्यातरी चांगल्या व्यक्तीला द्यावे,” असेही गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. रामदास कदमांनी स्वत:चा मुलगा निवडणूक लढणार हे जाहीर करण्यापेक्षा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ किंवा त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांच्याबद्दल का बोलत नाहीत? पक्षासमोर अनेक पर्याय असल्याचे त्यांनी
सांगितले.