Join us

हवामानात बदल झाल्यास मुंबईतही वाजणार थंडी! हवामान खात्यानं दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 7:33 AM

मध्य महाराष्ट्रात मात्र भरणार हुडहुडी; स्वेटर, मफलर तयार ठेवा

मुंबई : डिसेंबर महिना उजाडला तरी अजुनी हुडहुडी भरविणारी थंडी कशी पडत नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, हवामान विभागाने आता ‘गुड न्यूज’ दिली आहे. येणाऱ्या आठवड्यात कमाल तापमानतही घट होऊन गुलाबी थंडी पडू शकते, त्यामुळे स्वेटर, मफलर अशी उबदार कपडे लपेटून बाहेर पडावे लागणार आहे. 

अद्यापही मुंबईसह राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी पडलेली नाही. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या एल-निनोच्या वर्षात थंडीचा पॅटर्न वेगळा जाणवत आहे. मात्र, जर हवामानात बदल झाले तर कदाचित कडाक्याची थंडीदेखील पडू शकते. 

पुढील ८ ते १० दिवसांत राज्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही घट होऊन गारठा वाढू शकतो. - कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक,भारतीय हवामानशास्त्र विभाग.

कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता जाणवते आहे. अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्र भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली आहे. उत्तर भारतात सध्या एकापाठोपाठ प्रवेशणारे पश्चिमी झंजावात, त्यातून पडणारा पाऊस व बर्फबारीमुळे तेथील सकाळची दृश्यता खालावली असून, तेथे थंड वातावरण व धुके जाणवत आहे. - माणिकराव खुळे, माजी हवामानतज्ज्ञ

राज्यातील अनेक शहरांत धुक्याची चादरकडाक्याच्या थंडीचा अनुभव शुक्रवारी पुणेकरांनी घेतला. पहाटेच शहरावर धुक्याची दुलई पसरली होती. त्यामुळे समोरचेही काही दिसत नव्हते. हवेतील आर्द्रता ९८ टक्के असल्याने रस्त्यावरील दृष्यमानता कमी झाली होती. हवेत गारठा वाढल्याने पुणेकर गारठून गेले होते. राज्यामध्ये गुरुवारी पहाटे सर्वत्र धुके दाटले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यात आणखी भर पडली.

टॅग्स :मुंबईहवामान