Join us

प्रवासी नसतील तर रिक्षा, टॅक्सीसह एसटीचीही चाके थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सोमवार ते शुक्रवार कठोर निर्बंध आणि शनिवार, रविवारसाठी लॉकडाऊन जाहीर ...

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सोमवार ते शुक्रवार कठोर निर्बंध आणि शनिवार, रविवारसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचा सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. लोक घराबाहेर पडणार नाहीत. त्यामुळे प्रवासी मिळाले नाही तर एसटी, रिक्षा, टॅक्सीचे चाकेही थांबणार असल्याची खंत चालकांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने २ तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. तर एसटी आणि बेस्टमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवासाची परवानगी आहे.

एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनामुळे काही जिल्ह्यात एसटी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एसटीला सध्या प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. राज्यात ८००० गाड्या सुरू असून प्रवासी संख्या १८ लाखांवर आले आहे तर उत्पन्नही सहा ते सात कोटी मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही तर गाड्या सोडल्या जाणार नाहीत.

स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने २ तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. लोक घराबाहेर पडत नसल्याने नेहमीच्या तुलनेत मंगळवारी प्रवाशांची संख्या ५० टक्के कमी झाली. शनिवार, रविवारी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळेल. प्रवाशांअभावी रिक्षा, टॅक्सी उभ्या कराव्या लागतील.

* लोकलसाठी नवी नियमावली नाही!

सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले असले तरी, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मुंबई उपनगरीय लोकलसाठी नवीन नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना मर्यादित वेळेत रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

...........................