लोकहीत साधावयाचे असेल, तर कामाला मर्यादा असू नयेत - मनीषा वर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 04:04 AM2019-07-29T04:04:07+5:302019-07-29T04:04:28+5:30

बांधकाम कक्ष स्वतंत्र्यरीत्या स्थापन केला असून, शाळा दुरुस्तीसाठी काम सुरू आहे.

If there is to be a public good, then there should be no limit to work - Manisha Verma | लोकहीत साधावयाचे असेल, तर कामाला मर्यादा असू नयेत - मनीषा वर्मा

लोकहीत साधावयाचे असेल, तर कामाला मर्यादा असू नयेत - मनीषा वर्मा

googlenewsNext

प्रशासकीय सेवेत कशा आलात?

सामाजिक कार्य करणे ही माझी आवड आहे. १७ वर्षे मी विविध विभागांत काम केले आहे. मी दिल्लीत यापूर्वी सेवा बजावली आहे. मुंबई आणि मंत्रालयात पहिल्यांदा काम करत असून, आता आदिवासी विकास विभागात कार्यरत आहे. सार्वजनिक सेवा प्रदान करताना अनेक अडचणी येतात. अनेक आव्हान असतात. मात्र, मी खचत नाही आणि सोबतच्या लोकांनाही खचू देत नाही.

निधी कसा उपलब्ध होतो?

राज्याच्या अर्थसंकल्पातून आदिवासी विकास विभागासाठी निधी मिळतो. ९.४ टक्के पैसा आदिवासी उपाययोजनांसाठी काढतो. आमच्या विभागाच्या नावात आदिवासी शब्द आला, म्हणजे सर्व जबाबदारी आमची असे होत नाही. कारण कुपोषणासाठी एक विभाग आहे. रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. आम्ही समन्वयाचे काम पाहतो.

कामाचे विकेंद्रीकरण कसे केले आहे?
बांधकाम कक्ष स्वतंत्र्यरीत्या स्थापन केला असून, शाळा दुरुस्तीसाठी काम सुरू आहे. स्कूल हेल्थ कमिटी स्थापन केली असून, बालमृत्यू रोखण्यावर भर देत आहोत. मुलांच्या शिक्षणाचे पैसे शिक्षणावरच खर्च व्हावेत, म्हणून पालक मेळावे घेत जनजागृती सुरू आहे. क्रीडा स्पर्धांत विद्यार्थ्यांना सहभाग घेता यावा, म्हणून विभाग काम करत आहे. विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे प्रशिक्षण देत आहोत. कामाचे धोरणात्मक स्तरावर विक्रेंद्रीकरण केले आहे. ५० टक्के बजेट शिक्षणावर खर्च केले जात आहे. ५०२ आश्रमशाळा आहेत. पावणेपाच लाख विद्यार्थी आहेत.

आदिवासी जमिनीबाबत कसे काम करता?
आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी, जमिनीचे हक्क मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने वनमित्र मोहीम राबविण्यात आली. प्रलंबित वनहक्क दावे आणि अपील यांचा निपटरा करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. याद्वारे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

मिशन शौर्य-२ बाबत काय सांगाल?
मिशन शौर्य-२ अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांनी १६ मे, २०१८ रोजी शिखर यशस्वीपणे सर केले. २०२० या वर्षात एव्हरेस्ट सर करण्यासाठी राज्यात अंतिम निवड झालेल्या ९ विद्यार्थ्यांनी २३ मे रोजी माउंट एव्हरेस्ट सर केले.
इंग्रजी, विज्ञान प्रशिक्षण कसे सुरू आहे?
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी हसत खेळत शिकविण्यासाठी इंग्रजी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १३२ आदिवासी शासकीय आश्रमशाळेत हा कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी चेन्नईमधील एका संस्थेशी करार करण्यात आला. शिवाय एकलव्य फाउंडेशनमार्फत ४०० आश्रमशाळेत विज्ञान विषयाचे आकलन प्रयोगाद्वारे होण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सर्व आश्रमशाळेतील विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कायापालट अभियान कसे सुरू आहे?
शाळांना आणखी सुदृढ करण्यासाठी कायापालट अभियान हाती घेण्यात आले. यासाठी २४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शाळांचा विकास करणे आणि शाळांना अत्याधुनिक सेवा पुरविणे हा यामागचा मूळ हेतू आहे. ५०२ शाळांची विकास योजना तयार करण्यात आली. कायापालाट पोर्टल लाँच करण्यात आले. सर्वसाधारण दुरुस्तीसाठीची परवानगी शाळा समितीला देण्यात आली आहे. शाळासाठीचे फर्निचर अथवा तत्सम साहित्य बनविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. १०४ नव्या कामांना परवानगी देण्यात आली आहे.

ग्रीन एनर्जी आश्रम कसे उभे राहत आहेत?
ग्रीन एनर्जी आश्रम शाळाबाबत काम सुरू आहे. यासाठीचे बजेट २.६७ कोटी एवढे आहे. पहिल्यांदा पाच शाळांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येत आहे. शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब याद्वारे करण्यात येत आहे. पर्यावरणपूरक आश्रय शाळा उभ्या करणे हा यामागचा हेतू आहे.

खुला आसमान उपक्रम कुठे आणि कसा सुरू आहे?
पालघर जिल्ह्यातील सहा आश्रमशाळांत खुला आसमान हा उपक्रम राबविण्यात आला. तब्बल २ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आणि या उपक्रमाचे बजेट ३७.५० लाख होते. या व्यतिरिक्त ४०६ शाळांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. यात १.४ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सुदृढ आरोग्यासाठी काय काम सुरू आहे?
अटल आरोग्य वाहिनी या उपक्रमाकरिता तीन वर्षांसाठी ५३.४७ कोटी बजेट होते. १.३१ लाख विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. ३०९ आश्रमशाळेत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, या उपक्रमाचा फायदा लगतच्या गावांनादेखील झाला. रुग्णवाहिकेसह डॉक्टर, लसी आणि सर्पदंशावरील उपचारांचा यात समावेश होता.
आरोग्याबाबत जनजागृती कोणत्या स्तरावर होते?
स्कूल हेल्थ मॅनेजमेंट सीस्टिम या उपक्रमासाठी ११.२२ कोटी एवढे बजेट होते. ८५ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. २०७ आश्रम शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचे दैनंदिन आरोग्य सुदृढ कसे राहील? यावर या उपक्रमात भर देण्यात आला. दिवसाचे २४ तास आरोग्यसेवा पुरविणे हा या मागचा उद्देश होता. आरोग्य जनजागृतीच्या माध्यमातून १६९ शाळांमध्ये प्रशासनाला पोहोचला आले.
माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग होतो?
बांबू प्रॉडक्शन, कौशल्य विकास, वनमित्र मोहीम, आरोग्य अभियान, इंटरप्रिन्युरशिप प्रोग्राम, वारली पेटिंग, शाश्वत रोजगार, नागरी कार्याचे वेगाने संचलन आणि पारदर्शकता, प्रशिक्षण आणि कार्यशाळा, वनांचे संवर्धन आणि व्यवस्थापना अनेक उपक्रम आश्रम शाळांतून राबविण्यात आले. याचा फायदा शिक्षकांसह विद्यार्थ्यांना झाला. ट्रायबल रिसर्च अँड टेÑनिंग इन्स्टिट्यूटद्वारे संशोधनाकात्मक प्रकल्पांना चालना मिळाली. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी संकेतस्थळही सुरू करण्यात आले.

शैक्षणिक मदत कशी करता?
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तू वितरित करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येत आहे. बँकेत जमा झालेल्या रकमेतून छत्री, साबण, शालेय साहित्य, लेखन सामुग्री, गणवेश, सतरंजी, बेडशीट अशा वस्तू खरेदी करणे शक्य झाले आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते नववी आणि दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या संदर्भातील रक्कम देण्यात येत आहे. निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, निवासी साहित्यासाठी थेट लाभ अशा अनेक घटकांचा यात समावेश आहे.
शब्दांकन - सचिन लुंगसे

लोकहीत साधावयाचे असेल, तर तुमच्या कामाला मर्यादा
असू नयेत. आयएएस अधिकाऱ्यांकडून लोकांच्या खूप अपेक्षा असतात. परिणामी, सकारात्मक मानसिकता ठेवून आम्ही काम करतो. आदिवासी विकास विभागात काम करताना, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आम्ही ठेवल्याचे आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले.

Web Title: If there is to be a public good, then there should be no limit to work - Manisha Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.