Join us

मराठीवर अन्याय झाला तर खळखट्याक होणारच - मनसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 12:39 PM

चर्चेतून प्रश्न सुटला तर ठिक नाहीतर महाराष्ट्रात यशराजची शूटिंग होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

मुंबई - चर्चेतून प्रश्न सुटला तर ठिक नाहीतर महाराष्ट्रात यशराजची शूटिंग होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. देवा आणि गच्ची या दोन्ही मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याने आधीच मनसेने थिएटर मालकांना मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला होता. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जे कोणी मल्टिप्लेक्स मराठी चित्रपटांना स्क्रिन देत नसतील त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

मराठी चित्रपटासाठी भीक मागावं लागतं हे दुर्देवी असल्याची खंत अमेय खोपकर यांनी व्यक्त केली आहे. यशराज फिल्मचा मुजोरीपणा खपवून घेतली जाणार नाही. यशराजचं शुटिंग महाराष्ट्रात होतं हे लक्षात ठेवावं असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. आंदोलनामुळे मराठी सिनेमांची पब्लिसिटी होत असेल, तर चूक काय? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. 

देवा आणि गच्चीला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोणत्याही स्थितीत देवाला थिएटर मिळणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठीवर अन्याय झाला तर खळखट्याक होणारच असंदेखील अमेय खोपकर म्हणाले आहेत. 

एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'देवा' चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नसल्याने थिएटर मालकांना इशारा दिला असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा मनसेवर टीका केली आहे. मनसेच्या गुडांचा सामना करण्यासाठी बाऊन्सर ठेवावेत असा सल्ला संजय निरुपम यांनी थिएटर मालकांना दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून संजय निरुपम यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

'मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, पण मनसेने थिएटर मालकांना धमकी देणे स्विकार नाही. टायगर जिंदा है चित्रपटाच्या रिलीजसाठी पोलिसांनी सुरक्षा पुरवली पाहिजे अन्यथा मनसेच्या गुंडांचा सामना करण्यासाठी थिएटर मालकांनी बाऊन्सर ठेवावेत', असं संजय निरुपम म्हणाले आहेत. संजय निरुपम यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मनसे विरुद्ध काँग्रेस लढाई सुरु होणार आहे. याआधी परप्रांतीयांच्या मुद्यावरुन दोन्ही पक्ष आमने-सामने आले होते. 

येत्या शुक्रवारी सलमान खान, कतरिनाचा 'टायगर जिंदा है' सोबत अंकुश चौधरीचा 'देवा' आणि 'गच्ची' हे दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहे. पण 'देवा' आणि 'गच्ची' या दोन्ही चित्रपटांना सिनेमागृह मिळत नसल्याचं समोर आलं आहे. देवा सिनेमाला थिएटरर्स मिळत नसल्याने निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतली होती. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत आमच्या “खास” भाषेत तुम्हाला समजावून सांगायला लागेल असा इशारा दिला होता. मुंबई आणि उपनगरांतील 22 तारखेचे सुमारे 98 टक्क्यांहून अधिक शो सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘टायगर जिंदा हैं’च्या नावावर आहेत.

टॅग्स :मनसेदेवाटायगर जिंदा है