मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं विधान राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तसंच राज्याला मुख्यमंत्री नसल्याचा विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं आहे. आरोप-प्रत्यारोप करणं विरोधकांचं काम आहे. जनतेला भरकटवणं हे विरोधकांचं काम आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या हस्ते रविवारी त्यांच्या वरळी मतदरासंघात अनेक विकासकामांचं उद्धाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जांबोरी मैदान चांगलं करा अशी मागणी येथील मुलांनी केली होती. त्यानुसार येथे कायापालट केला आहे. याशिवाय गार्डनची, फुटपाथची, सुशोभीकरणाची कामं आम्ही करत आहोत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. पुढे ते म्हणाले की, निवडणुकीत झालेल्या कामांवर रेटिंग झालं तर शिवसेना एक नंबर ठरेल. पण आम्ही निवडणुक असताना, नसताना काम करत असतो, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
विरोधकांकडे लक्ष न देणंच योग्य आहे. ते काही ना काही आरोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रीत केलेलं बरं. हल्लीच जे सर्वेक्षण झालं त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप-फाइव्हमध्ये आहेत आणि जनता जनार्दन मुख्यमंत्र्यांसोबत ठाम उभी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत आहेत आणि लवकरच ते अॅक्शन मोडमध्ये दिसतील", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
कोरोनाची साथ अजूनही गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. रुग्णसंख्या वाढत आहे, असंही ते म्हणाले. तसंच शाळेच्या मुद्द्यावर बोलत असताना पालकांना वाटत असेल तरच त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही हे पालक आणि शाळेनं ठरवायचं आहे, असं म्हटलं आहे.
भाजपने पोकळ हिंदुत्व केलं आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भाजपने पोकळ हिंदुत्व केलं आहे. विविध राज्यात सोईचे राजकारण करतात. त्यांनी हिंदुत्वासाठी काही राज्यात गोवंश हत्या बंदी केली, तर काही राज्यात ही सुरू ठेवली आहे. हे म्हणतात आम्ही लोकशाहीचा अपमान केला. पण, तुम्ही आम्हाला गुलामाची वागणूक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.