केंद्रच नाही, मग अत्याधुनिक तपासणी कशी होणार? वर्षभरापासून केंद्रासाठी प्रक्रिया सुरू
By नितीन जगताप | Published: July 29, 2023 11:23 AM2023-07-29T11:23:28+5:302023-07-29T11:23:57+5:30
निविदा अंतिम टप्प्यात
नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहनांच्या तपासणीत सुसूत्रता यावी यासाठी मुंबईसह राज्यात २३ परिवहन विभागाकडून आरटीओचे अद्ययावत स्वयंचलित तपासणी केंद्र उभारण्यात येणार होते. यामध्ये मुंबईतील तीन केंद्रांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरातून स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची प्रक्रिया सुरू आहे. परंतु या कामासाठी निविदा अंतिम टप्यात आहेत. त्यावर उच्चस्तरीय समितीचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर एक ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी वाहनांना आगीच्या घटना घडल्या आहेत. वाहनांची अत्याधुनिक पद्धतीने तपासणी होण्यासाठी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र आवश्यक आहे. रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्य़ा यासह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची आरटीओत तपासणी होते. प्रथम नवीन वाहन नोंदणी करताना तपासणी होते. त्यानंतर दुसरी तपासणी दोन वर्षांनी आणि मग दरवर्षी तपासणी केली जाते. ब्रेक, प्रदूषण, वाहनांचे सस्पेंशन, चाक, वेग, हेडलाइट इत्यादींची तपासणी केली जाते. मात्र कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वाहन तपासणीसाठी बराच वेळ लागतो. याशिवाय तपासणीत सुसूत्रताही येत नाही. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही वाहन तपासणीसाठी २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक असणे आवश्यक असल्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार मुंबईतील आरटीओत वाहन तपासणीसाठी टेस्ट ट्रॅक उभारण्याची कार्यवाही सुरू आहे.
परिवहन विभागाकडून ऑक्टोबर २०१५ मध्ये नाशिकमधील पंचवटी परिसरात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारले. त्यानुसारच मुंबईतील मुंबई सेंट्रल, अंधेरी येथे अशीच यंत्रणा उभारण्यात येणार आहे. स्वयंचलित केंद्र उभे राहिल्यास दिवसाला एका ठिकाणी २०० पेक्षा जास्त वाहनांची तपासणी होईल. ही तपासणी बारकाईने होणार असून स्वयंचलित तपासणी यंत्र, टेस्ट ट्रॅक याशिवाय अन्य मोठी यंत्रणा उभारली जाईल.
मुंबईत कुठे होणार तपासणी केंद्र
राज्यात परिवहन विभागाकडून मुंबईतील एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगाराबरोबरच ताडदेव आणि अंधेरी येथे तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे.
दुचाकी : २६ लाख
कार : १४ लाख
रिक्षा : २.३ लाख
बस : २० हजार
मालवाहतूक वाहने : १.१६ लाख
रुग्णवाहिका : २ हजार