पार्किंगसाठी जागा नसेल, तर गाडी घ्यायचीच नाही का? सर्टिफिकेट दाखवा गाडी घ्या, प्रस्तावाला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:19 IST2025-01-17T09:17:36+5:302025-01-17T09:19:42+5:30
मुंबई आणि परिसरातील आक्रसत चाललेल्या निवासी जागा आणि त्यांच्या वाढत्या किमती, यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस विक्राळ होत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून आरटीओने नवीन पार्किंग धोरणात काही सूचना करण्याचे ठरविले आहे.

पार्किंगसाठी जागा नसेल, तर गाडी घ्यायचीच नाही का? सर्टिफिकेट दाखवा गाडी घ्या, प्रस्तावाला विरोध
मुंबई : आपल्या मालकीची चारचाकी असावी, हे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र, गाडी घ्यायची असेल, तर पार्किंगसाठी स्वत:ची जागा असल्याचा पुरावा देण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाकडून राज्य सरकारला पाठविण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे सामान्यांच्या गाडी घेण्याच्या स्वप्नावर रोडरोलर फिरण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि परिसरातील आक्रसत चाललेल्या निवासी जागा आणि त्यांच्या वाढत्या किमती, यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस विक्राळ होत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून आरटीओने नवीन पार्किंग धोरणात काही सूचना करण्याचे ठरविले आहे. त्यात गाडी घेताना तिच्या पार्किंगची व्यवस्था तुमच्याकडे आहे, हे दर्शविणारे प्रमाणपत्र सादर करण्याची अट टाकण्याचा विचार सुरू आहे. आरटीओच्या या प्रस्तावित सूचनेला विरोध होत आहे.
पार्किंग द्यायची कोणी ?
सर्व भागांमध्ये पार्किंग सर्टिफिकेट मिळवणे कसे शक्य होईल, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. विशेषत: शहरी भागांमध्ये इमारतींच्या जागा आणि त्यात उपलब्ध असलेली पार्किंग व्यवस्था अपूर्ण आहे.
हे प्रमाणपत्र मिळणे अनेकांसाठी दुरापास्त होईल. नवीन गाडी खरेदी करताना पार्किंगची व्यवस्था न मिळाल्यास, या धोरणामुळे मोठी समस्या होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांच्या मते...
पार्किंग प्रमाणपत्राच्या नियमाची अंमलबजावणी शहरी भागात जास्त कठीण होऊ शकते.
अनेक अपार्टमेंट्समध्ये पार्किंगची व्यवस्था कमी आहे आणि काही भागांमध्ये पार्किंग स्पॉट्सची संख्याही अपुरी आहे. अशा स्थितीत, नागरिकांना पार्किंग सर्टिफिकेट मिळवणे कठीण होईल.
प्रशासनाने अतिरिक्त पार्किंग जागा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असावे.
पार्किंग पॉलिसीसारख्या गोष्टींसाठी उशीर केला असला तरी सरकारने केलेली सुरुवात चांगली आहे. असे असले तरी त्यामध्ये सर्वंकष विचार गरजेचा आहे. नवीन गाड्या घेण्यावर नियम लावण्यासोबतच अस्तित्वात असलेल्या गाड्यांच्या पार्किंगचा विचार करणेही महत्त्वाचे असून, यासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकासही महत्त्वाचा आहे.
- विवेक पै, वाहतूकतज्ज्ञ
मुंबईसारख्या शहरांमध्ये आजही बरेच नागरिक ४० वर्षांपेक्षा जुन्या सोसायटीमध्ये राहत आहेत जिथे पार्किंगची सुविधादेखील नसते. अशा लोकांना गाडी घ्यायची असल्यास त्यांना या पॉलिसीचा त्रास होऊ शकतो. पार्किंग पॉलिसी गरजेची असून ती तयार करताना आणि तिची अंमलबजावणी करताना सारासार विचार सरकारने केला पाहिजे.
- ए.व्ही. शेणॉय, वाहतूकतज्ज्ञ