मुंबई - CM Eknath Shinde Reaction on Ed Action ( Marathi News ) ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही. ज्यांची काही चूक नसेल त्याला कर नाही तर डर कशाला हवा. कुठल्याही सूडभावनेने, राजकीय आकस ठेऊन हे सरकार काम करत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वायकरांच्या ईडी कारवाईवर दिली. उद्धव ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
या कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केला हे सर्वांना माहिती आहे. कोविडमध्ये किती पैसे खाल्ले...मृतदेहांच्या बॉडी बॅग्समध्ये पैसे खाल्ले, खिचडी ३०० ग्रॅमची १०० ग्रॅम केली. ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना कफनचोर म्हणायचे की खिचडी चोर म्हणायचे...त्यामुळे आरोप करताना पुराव्याशिवाय करू नये. जर कारवाई होत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. ज्याने काही चूक केली नाही त्याला घाबरण्याची गरज नाही. परंतु आम्ही कुठलीही सुडबुद्धीने कारवाई करत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच तुम्ही बंद केलेले प्रकल्प आज आम्ही त्यांना चालना देतोय. आज सगळ्या राज्यात प्रकल्प सुरू आहेत. १२ तारखेला एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होतंय. अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला ज्यांना आम्ही चालना देतोय. त्यामुळेच विरोधी पक्षात पोटशूळ उठला आहे. विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांच्या आरोपांना आम्ही आमच्या कामातून उत्तर देतोय असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधकांकडे दुसरे मुद्दे नाहीत. आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांकडे सुनावणी झाली त्याचा निकाल होईल. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्यादिवसापासून आमच्याकडे बहुमत आहे. निवडणूक आयोगानेही अधिकृत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिले आहे. त्यामुळे मेरिटप्रमाणे जो निकाल मिळाला पाहिजे तसा होईल. आम्ही कुठल्याही प्रकारे नियम सोडून काम केले नाही. घटनेच्या अधिकाराखाली हे सरकार स्थापन झाले आहे. बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष अधिकृत आम्हाला दिला आहे त्यावरूनच निर्णय होण्याची अपेक्षा आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.