बदल्यांची सीआयडी चौकशी न झाल्यास कोर्टात जाऊ, चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:30 AM2020-08-18T03:30:26+5:302020-08-18T06:52:10+5:30
सीआयडी चौकशी न झाल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
मुंंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये अलीकडे झालेल्या बदल्यांची सीआयडी चौकशी न झाल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले, बदलीच्या कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले व बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत, असा आरोप पाटील यांनी पत्रात केला आहे. बदलीच्या नियमांप्रमाणे तीन आयएएस अधिकाऱ्यांची आस्थापना समिती बदली प्रस्ताव तयार करते व त्यामध्ये बदल करायचा असेल तर संबंधित मंत्र्याने कारणाची लेखी नोंद करायची असते व नंतर मुख्यमंत्र्यांनी सही करायची असते. तीन वर्षे पूर्ण झाली नाहीत, अशांची बदली करायची असेल तरीही मंत्र्यांनी कारण लेखी नोंदवायचे व अंतिम स्वाक्षरी मुख्यमंत्र्यांनी करायची असा नियम आहे. या वेळी
ही प्रक्रिया पार पाडली का, याचा जाहीर खुलासा होण्याची गरज असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.