‘उसाला योग्य भाव न मिळाल्यास पुन्हा आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:14 AM2018-02-06T06:14:03+5:302018-02-06T06:14:08+5:30
साखरेच्या कोसळलेल्या दराचे कारण पुढे करत, साखर कारखानदार उसाला मान्य केलेला भाव देण्यास टाळाटाळ करत आहेत.
मुंबई : साखरेच्या कोसळलेल्या दराचे कारण पुढे करत, साखर कारखानदार उसाला मान्य केलेला भाव देण्यास टाळाटाळ करत आहेत. काहींनी तर एफ.आर.पी.सुद्धा देता येत नसल्याची भूमिका घेतली आहे. ही भूमिका निषेधार्य आहे. उसाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अन्यथा उसदरासाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
ऊसदरासाठी संघर्ष समितीने लोणी येथे केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर, साखरेच्या दराबाबत हस्तक्षेप करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. साखरेच्या भावावरून उसाचा भाव ठरविण्याऐवजी, उसाच्या भावावरून साखरेचा भाव ठरविण्यास समिती स्थापन करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते. याबाबत कार्यवाही न झाल्यानेदेखील हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.