Eknath Khadse: 'त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन'; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

By मुकेश चव्हाण | Published: October 23, 2020 04:27 PM2020-10-23T16:27:07+5:302020-10-23T16:31:26+5:30

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे.

'If they put an ED, I'll put a CD'; Eknath Khadse warns BJP after joining NCP | Eknath Khadse: 'त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन'; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

Eknath Khadse: 'त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन'; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

googlenewsNext

मुंबई: भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. 

४० वर्षात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही, कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. 

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळी तेही म्हणाले की, नाथाभाऊ आता तुम्हाला इथे भवितव्य नाही. पक्ष बदलायचा तर बदला, राष्ट्रवादीत जा, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

एकनाथ खडसेंच्या येण्याने आम्हाला बळ मिळेल – आमदार अनिल पाटील

२० वर्ष मी भाजपामध्ये असताना नाथाभाऊंसोबत होतो, भाजपानं कसा त्रास दिला आम्हाला माहितीये, जळगाव जिल्ह्यातील एकही जागा भाजपाला मिळणार असा विश्वास आहे. खासदार, आमदार यांनी आता लगेच राष्ट्रवादीत प्रवेश करावा ही अपेक्षा नाही, कारण निवडणुका घेणे अवघड असतं, त्यामुळे आगामी काळात हे सगळे नेते हळूहळू प्रवेश करतील, एकनाथ खडसेंच्या येण्याने आम्हाला बळ मिळालं आहे. असा दावा अमळनेरचे राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादी कार्यालयाच्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. काही निवडक लोकांनाचा कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला होती, त्यामुळे कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन कार्यकर्त्यांसाठी लावण्यात आली होती. तर तब्येतीच्या कारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते.  

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?

१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)

२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

खडसेंचा वापर राज्यासाठी करावा, भाजपासाठी नव्हे – भाजपा

एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विकासकामे करण्यासाठी करावा, विरोधकांसाठी नव्हे. एकनाथ खडसेंच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होईल ती भरून काढण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत, उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी होणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला आहे.

Web Title: 'If they put an ED, I'll put a CD'; Eknath Khadse warns BJP after joining NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.