"हे विधान जर मुस्लीम बांधवाने केलं असतं तर..?"; बच्चू कडू भिडेंवर बोलले, मुख्यमंत्र्यांनाही विचारले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 04:17 PM2023-07-31T16:17:49+5:302023-07-31T16:21:29+5:30

एवढ्या मोठ्या महापुरुषाबद्दल बोलताना प्रत्येकाने आपली औकात पाहिली पाहिजे. तुम्ही स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले आहात

If this statement had been made by a Muslim brother..; Bachu Kadu also got angry at Bhide | "हे विधान जर मुस्लीम बांधवाने केलं असतं तर..?"; बच्चू कडू भिडेंवर बोलले, मुख्यमंत्र्यांनाही विचारले

"हे विधान जर मुस्लीम बांधवाने केलं असतं तर..?"; बच्चू कडू भिडेंवर बोलले, मुख्यमंत्र्यांनाही विचारले

googlenewsNext

मुंबई - शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंनी एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरू केल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. अगोदर महात्मा गांधी, नंतर महात्मा फुले आणि आता शिर्डीच्या साईबाबांबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केलं. भिडेंच्या या विधानावरुन लोकं रस्त्यावर उतरली. तर, विधानसभेतही गोंधळ झाला. आता, आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडेंबाबत रोखठोक भूमिका घेत, मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं, असे म्हटलं आहे. तसेच, भिडेंच्या विधानांची काही उदाहरणंही त्यांनी दिली. 

एवढ्या मोठ्या महापुरुषाबद्दल बोलताना प्रत्येकाने आपली औकात पाहिली पाहिजे. तुम्ही स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले आहात. मग, स्वातंत्र्य लढ्यात तुमचं योगदान काय आहे?, असा सवालच आमदार बच्चू कडू यांनी विचारला आहे. स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी तुम्ही काही केलंय का?, सर्वसामान्यांचा आवाज बनून, त्यांचं दु:ख कमी करण्यासाठी तुम्ही काही केलंय का?, असे सवाल आमदार कडू यांनी विचारले. तसेच, महात्मा गांधींबद्दल काही अपवादात्मक गोष्टी बाहेर काढून त्यांना बदनाम करणं हे चुकीचं आहे. यावर भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी आपलं मत स्पष्ट केलं पाहिजे. सावरकर असतील किंवा इतरही महापुरुष असतील, यांच्याबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली. 

... तर देशद्रोही म्हटलं असतं

तिरंग्याबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दलही संभाजी भिडेंचं मत वेगळं आहे. हेच जर एखाद्या मुस्लीम बांधवाने म्हटलं असतं तर, आपण लगेच एक्शनवर आलो असतो. लगेच, देशद्रोही म्हटलं असतं. मग, यांना काय म्हणायचं, देशद्रोहीच म्हणायचं का?, असा सवालही कडू यांनी उपस्थित केला आहे. तिरंग्याबद्दल जर हे असं बोलत असतील तर यांना भारताबाहेरच काढलं पाहिजे, असेही कडू यांनी म्हटलं. कडू यांनी रोखठोक भूमिका मांडत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. 

भिंडेंचा भाजपाशी संबंध नाही - फडणवीस

संभाजी भिडे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांची संघटना चालवतात. त्यामुळे याला राजकीय रंग देण्याचं कारण नाही, असं स्पष्ट शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, कोट्यवधी लोकं अशा विधानाने संतप्त होतात. महात्मा गांधीविरोधात असं बोललेलं लोकं कधीही सहन करणार नाहीत. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर कुणाबद्दलही असो आम्ही बोललेले सहन करणार नाही. तसेच, याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे. त्यानंतर, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांची री.. ओढली. 
 

Web Title: If this statement had been made by a Muslim brother..; Bachu Kadu also got angry at Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.