वेळ पडल्यास उत्तर मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करीन, खासदार गोपाळ शेट्टी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 10:44 AM2024-03-16T10:44:11+5:302024-03-16T10:45:11+5:30
कार्यकर्ता मेळाव्यात मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांचे प्रतिपादन.
रेश्मा शिवडेकर, मुंबई : भाजपच्या उत्तर मुंबईतील आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहून एकजुटीचा संदेश देतानाच मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांकरिता वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका इथले मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना यंदा भाजपने उत्तर मुंबईचे तिकीट दिले आहे. नगरसेवक असल्यापासून शेट्टी यांनी पद्धतशीरपणे आपल्या कामाचा विस्तार करत हा मतदारसंघ बांधला. गेली दहा वर्षे उत्तर मुंबईचे खासदारपद भूषविल्यानंतर शेट्टी यावेळीही उमेदवारीकरिता इच्छुक होते. मात्र त्यांच्याऐवजी गोयल यांना तिकीट दिले गेल्याने गोपाळ शेट्टी आता काय भूमिका घेतात, याकडे भाजपा कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले होते. त्यात गोयल यांच्या स्वागताकरिता घेण्यात आलेल्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात शेट्टी यांनी आपल्यातील संघर्षशील नेत्याची चुणूक दाखवून दिली.
त्या टाळ्या कोणासाठी?
व्यासपीठावरील भाजपा नेत्यांची भाषणे झाल्यानंतर सर्वांत शेवटी पीयूष गोयल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता म्हणून उभे राहिले. शेट्टी यांचे आभार मानणारे वाक्य ते सुरू करतात तोच सभागृहातून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. हा कडकडाट तब्बल मिनिटभर सुरू होता. तो नेमका गोयल यांच्या उमेदवाराचे स्वागत करणारा होता, की शेट्टी यांच्या निरोपाचा, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.
१) कांदिवली, दहिसर भागांत केंद्रीय संरक्षण खात्याच्या आसपासच्या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्याकरिता शेट्टी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. आपण उत्तर मुंबईतील मतदारांसाठी खूप काम केले, अनेक प्रश्न सोडवले. मात्र हा एक प्रश्न सोडवण्यात आपल्याला यश आले नाही. त्यामुळे गोयल यांनी निवडून आल्यानंतर उत्तर मुंबईकरांचा हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. गरज पडल्यास मतदारांकरिता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली.
२) भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि उत्तर मुंबईचे भाजपचे माजी खासदार राम नाईक, आमदार योगेश सागर, अतुल भातखळकर, सुनील राणे, मनीषा चौधरी, आदी नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष भाई गिरकर हेदेखील प्रकृती साथ देत नसताना एकजुटीचे दर्शन घडविण्याकरिता व्यासपीठावर हजर होते.