आरेत वृक्षतोड केल्यास मुंबईचा होईल -हास!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:54 AM2019-09-17T00:54:15+5:302019-09-17T00:54:26+5:30
मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २ हजार ७०० झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला आहे.
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २ हजार ७०० झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला आहे. प्राधिकरणाचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांनी मात्र नाकारला आहे. आरे कॉलनीचे काँक्रिटीकरण झाल्यास मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडेल. तसेच आरेमधील भूजलावरही परिणाम होईल, असे सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईचे फुप्फुस असलेली आरे कॉलनीतील वृक्ष संपदा तोडू नये, असे मत मुंबईकरांनी या सर्वेक्षणातून व्यक्त केले आहे. या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांतील हजारो नागरिकांशी संपर्क साधून त्यांचे या वृक्षतोडीबद्दलचे मत जाणून घेतले. या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी गोरगाव पूर्व येथील आरे कॉलनीमधील तब्बल २ हजार ७०२ झाडे तोडण्यात येणार आहेत. यातील २ हजार २३८ झाडे तोडण्यात येणार असून ४६४ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव दीड वर्ष रखडल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत गेल्या महिन्यात भाजपने बहुमताने मंजूर केला. मात्र शिवसेनेने हा विरोध कायम ठेवत न्यायालयात धाव घेतली आहे.
त्याचबरोबर शिवसेनेचे महापालिकेतील माजी नामनिर्देशित नगरसेवक व सेंट झेव्हिअर्सचे प्रा. अवकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांनी केले. पर्यावरणप्रेमी
संस्था व जागरूक मुंबईकरांनी
‘सेव्ह आरे’ मोहीम सुरू केली
आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काश फाउंडेशनच्या सहकार्याने मुंबईच्या विविध भागांत, विविध क्षेत्रातील नागरिकांना मेट्रो कारशेडबाबत प्रश्न विचारून
सर्वेक्षण केले. यामध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देताना नागरिकांनी
मेट्रो कारशेडमुळे आरे कॉलनीतील जैवविविधता आणि जनजीवनाला धोका पोहोचणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
>कारशेडसाठी आरेचा अट्टाहास का?
राज्य शासनानेच नेमलेल्या ‘त्री-सदस्यीय’ समितीने कांजूरमार्ग येथे जागा सुचविली असताना आरेतील जागेचा अट्टाहास का धरला जात आहे, असा प्रश्न मुंबईकरांनाही पडला आहे. आरे कॉलनीत कारशेडसाठी झाडे तोडली की त्यानंतर भविष्यात तिथे आणखी वृक्ष तोडले जाऊ शकतात. अन्य हरितपट्टेही विकासासाठी खुले होतील, असे मत प्रा. अवकाश जाधव यांनी व्यक्त केले.
>तज्ज्ञांची आयुक्तांकडून पाठराखण
मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत विरोध केला जात असताना भाजपने तो प्रस्ताव सदस्यांच्या साह्याने मंजूर करून घेतला. मात्र तज्ज्ञ सदस्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये दिले गेले असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या आरोपामुळे तज्ज्ञ डॉ. शशिरेखा सुरेश कुमार यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी हे आरोप पूर्णत: निराधार असल्याचे मत व्यक्त करीत तज्ज्ञांची पाठराखण केली आहे. तज्ज्ञांनी आयुक्तांना ईमेल करून आपली खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आयुक्तांनी प्रसिद्धिपत्रक काढून शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत.