मुंबई - एका बाजूला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पर्यावरण दिनाच्या दिवशी झाडांची कत्तल होते. त्याच दिवशी 'वसुंधरा अभियान' नावाचे अभियान वन खात्यामार्फत जाहीर केले जाते. सध्या असलेली झाडे तोडायची आणि वसुंधरा अभियान राबवण्याची घोषणा करायची हा विरोधाभास एकीकडे आहे आणि भाजपची झाडं लावणं, ती वाढवणे आणि तीच संरक्षण करण्याची भूमिका आहे, असा तिरकस टोला आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसरच्या भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी ऑक्सिजनपूरक ५००० वृक्षांच्या वृक्षारोपणाचा संकल्प सोडला. बोरिवली ठाकूर कंपाउंड येथे झालेल्या या कार्यक्रमात दरेकर बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार मनीषा चौधरी, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मंडळ अध्यक्ष अरविंद यादव, नगरसेवक जितेंद्र पटेल, नगरसेवक जगदिश ओझा, नगरसेवक हरीश छेडा तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरेकर पुढे म्हणाले की, आमदार मनीषा चौधरी यांनी ५००० सोडला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी जे जे संकल्प या उत्तर मुंबई जिल्ह्यासाठी केले त्या संकल्पाना पूर्ण करण्याचे काम उत्तर मुंबईमधील कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यांनी रक्तदानासारखा संकल्प कोरोना काळात केला होता, ५००० बाटल्या रक्त जमा होण्याबाबत अनेकांनी थट्टा उडवली होती, पण खासदार शेट्टी यांचा संकल्प अलीकडेच पूर्ण झाला. झाडांची संख्या कमी होत असून वातावरणात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. करोना काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्व पटले आहे. त्यामुळे सर्वांनीच झाडांचं रक्षण केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मागठाणे विधासभा क्षेत्रात देखील १००० झाडं लावण्याच नियोजन करणार असल्याचं आश्वासन दरेकर यांनी दिले.