Bullet Train India And Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वांत महत्त्वाकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे बुलेट ट्रेन. अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांदरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली. भारत आणि जपान यांच्यात करार झाला आणि जपानने या प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्याची तरतूद या करारात करण्यात आली. या प्रकल्पाचे काम अधिकृतरित्या सप्टेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आले. या समारंभाला भारत आणि जपान या दोन्ही देशाचे पंतप्रधान उपस्थित होते. त्यावेळेस भारतीय रेल्वेने एका निवेदनात म्हटले होते की, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. परंतु, आता २०२५ उजाडले तरी बुलेट ट्रेनची पहिली झलकही पाहायला मिळालेली नाही. जानेवारी २०२५ मध्ये अशी एक माहिती समोर आली की, मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेनच्या हायस्पीड ट्रॅकवर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. यासाठी काही कारणेही देण्यात आली. यानंतर आता हायस्पीड ट्रॅकवर वंदे भारत ट्रेनच धावडवायची होती, तर देशाला बुलेट ट्रेनचे स्वप्न का दाखवले, असा प्रश्न पडू लागला आहे.
मुंबई-अहमदाबाद या ५०८ कि.मी. अंतराच्या अति वेगवान रेल्वे प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. २००९-२०१० वर्षाच्या राष्ट्रीय रेल्वे अर्थसंकल्पात व्यवहार्यतेच्या अभ्यासासाठी या प्रकल्पाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गात पुण्याचा एक विभाग म्हणून समावेश करण्यात आला होता, जो नंतर डोंगराळ प्रदेश आणि वाढीव खर्च अशा दोन घटकांमुळे वगळण्यात आला. मुंबई-अहमदाबाद विभागाचा पाठपुरावा सुरूच राहिला आणि २०१३ साली व्यवहार्यता अभ्यासासाठी जपानसोबत सामंजस्य करार करण्यात आला. कित्येक प्रश्न उद्भवले, त्यातील काही बाबी तांत्रिक आणि काही प्रशासकीय होत्या, त्यांचे निवारण महाराष्ट्र सरकार, गुजरात सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात होणे गरजेचे होते. या प्रकल्पाच्या कामाला वेग प्राप्त होण्यासाठी, २०१६ मध्ये एक एसपीव्ही (विशेष उद्देश वाहन), राष्ट्रीय हाय-स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाला अनेक प्रकारच्या मंजुरी मिळण्याची आवश्यकता होती आणि त्यामुळे प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष २०२० साली काम सुरू होऊ शकले. रेल्वे धावण्याचा वेग ताशी ३५० किमी इतका असण्याची शक्यता असून ही ‘बुलेट ट्रेन’ दोन शहरांमधील अंतर तीन तासांपेक्षा कमी वेळेत कापेल. मुंबई आणि अहमदाबाद शहरास जोडणाऱ्या या मार्गाच्या ५०८ किलोमीटर प्रवासापैकी सव्वाशे किमीचा हिस्सा महाराष्ट्रात आहे. बारापैकी चार स्थानके - मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार आणि बोईसर महाराष्ट्रात आहेत. तर उरलेली आठ - वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद ही गुजरातमध्ये आहेत.
रेल्वेची अपरिहार्यता आणि वंदे भारत ट्रेनची एन्ट्री
- बुलेट ट्रेनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता रेल्वे प्रोजेक्ट म्हणजे वंदे भारत ट्रेन. देशभरात वंदे भारत ट्रेनचे जाळे तयार करण्याचा मानस भारतीय रेल्वेचा आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले, तेथील जवळपास सर्वच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावरून पंतप्रधान मोदी यांच्यासाठी हा प्रकल्प आणि त्याचा विस्तार किती महत्त्वाचा आहे, ते लक्षात येते. जानेवारी २०२५ पर्यंत देशभरात ६६ रेल्वे मार्गांवर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू आहे. तर, अहमदाबाद ते भूज या मार्गावर वंदे भारत मेट्रो ही सेवा सुरू आहे. याचा विस्तारही भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तर, वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी विविध मार्गांवर घेतली जात असून, अगदी लगतच्या काळात वंदे भारत स्लीपर ट्रेनच्याही अनेक सेवा सुरू होतील. त्यामुळे भारतीय रेल्वेकडे वंदे भारत ट्रेनचा पाया पक्का झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन आहे. चाचणीवेळी या गाडीने १८० किमी प्रति तासापर्यंतचा वेग गाठला होता. बुलेट ट्रेनचे डबे यायला उशीर लागत असल्यामुळे आता याच वंदे भारत ट्रेनचा उपयोग भारतीय रेल्वे हायस्पीड कॉरिडॉरमध्ये करणार आहे. वंदे भारत ट्रेनची बनावट आणि क्षमता यात अपेक्षित बदल करून वंदे भारत ट्रेनच हायस्पीड बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर चालवण्याचा भारतीय रेल्वेचा सध्याचा मानस आहे.
बुलेट ट्रेन यायला उशीर का होत आहे?
- जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत असल्याने बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टम लेव्हल-२ सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवली आहे. ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणार आहे. वंदे भारत गाड्या तात्पुरत्या उपाय म्हणून बुलेट ट्रेन मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी युरोपियन ट्रेन कंट्रोल सीस्टिम लेव्हल-२ सिग्नलिंग सीस्टिम बसवली जाईल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरशन लिमिटेडने सात वर्षाच्या करारासाठी निविदा जारी केली आहे. सुविधा पडून राहण्यापेक्षा त्यांचा वापर वंदे भारत ट्रेनसाठी करता येईल. या काळात बुलेट ट्रेनसाठी लागणारी सिग्नल यंत्रणा लावता येईल. २०२६ मध्ये सूरत-बिलिमोरा दरम्यान शिंकान्सेन बुलेट ट्रेन धावतील, असे अपेक्षित होते, परंतु आता ते २०३० पूर्वी शक्य नाही, असे मानले जात आहे. तसेच २०१७ मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ झाला होता, त्याला आता ८ वर्षे होत आहेत. २०३० पर्यंत जपानी बनावटीची बुलेट ट्रेन खरेदी करण्याबाबत रेल्वेचे अधिकारी आशावादी आहेत. तोपर्यंत वंदे भारत ट्रेनचा अंतरिम वापर प्रवाशांच्या गरजा पुरेशा प्रमाणात पूर्ण करू शकेल, असे रेल्वेशी संबंधित काहींचे म्हणणे आहे. तसेच ८ डब्यांची वंदे भारत बुलेट ट्रेनचे एक प्रोटोटाइप व्हर्जन आयसीएफ तयार करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
अमृत भारत ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांची दिशाभूल
- वंदे भारत चेअर कार ट्रेन अगदी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. प्रवाशांमध्ये आजही वंदे भारत ट्रेनची क्रेझ आहे. एक काळ असा होता की, राजधानी ट्रेनने प्रवास करण्याचे भारतीयांचे स्वप्न असायचे. आता तेच स्वप्न वंदे भारत ट्रेनच्या प्रवासासाठी पाहिले जाते. यावरून वंदे भारत ट्रेन भारतीयांनी स्वीकारल्याचे, त्यांना ती आवडल्याचे दिसून येत आहे. परंतु, वंदे भारत चेअर कार ट्रेनचे तिकीट दर जास्त असल्यामुळे ती सामान्यांची ट्रेन नाही, असा सूर उमटू लागला आणि यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने अमृत भारत ट्रेनचे टूमणे काढले. संपूर्ण LHB बनावटीचे डबे आणि त्याला मागे पुढे इंजिन लावून वंदे भारत ट्रेनचे रुप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, सामान्य वंदे भारत ट्रेनच्या नावाखाली अमृत भारत ट्रेन म्हणजे प्रवाशांची केलेली ही दिशाभूलच म्हणावी लागेल. आता अमृत भारत ट्रेनचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आता केवळ २ मार्गांवर सुरू असलेली अमृत भारत ट्रेन पुढील काही काळात देशातील अनेक मार्गांवर धावताना पाहायला मिळू शकेल.
आता सर्वच रेल्वे वंदे भारत करा, भारतीय रेल्वेला हे अशक्य नाही
- आयसीएफ बनावटीचे जुने डबे अनेक दृष्टीने कालबाह्य झाले होते. त्याची जागा नवीन आधुनिक बनावटीच्या LHB डब्यांनी घेतली. आता सर्वच ट्रेन LHB बनावटीच्या डब्यासह चालवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. परंतु, त्याला अद्याप काही वर्षे जातील. दुसरीकडे ज्या LHB डब्यांवर भारतीय रेल्वेने इतका विश्वास टाकला होता, ते डबे ओडिशातील बालासोर रेल्वे अपघात आणि त्यानंतर झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये फेल ठरलेले दिसले. कारण LHB डब्यांची बनावट, त्यातील सुरक्षितता आणि अत्याधुनिकता यामुळे अपघात झालाच तर होणारे नुकसान कमी प्रमाणात असू शकेल, असे मानले जात होते. परंतु, अलीकडे झालेले हे अपघात या सर्व मान्यतांना छेद देणारे ठरले. त्यामुळे आता LHB बनावटीचे डबे कालबाह्य करून वंदे भारत ट्रेन सर्वेसर्वा करण्याकडे भारतीय रेल्वेने विचार करायला हवा. भारतीय रेल्वेला हे अगदीच शक्य आहे. कारण, डबलडेकर ट्रेन, नवीन बनावटीच्या लोकल ट्रेन, वंदे भारत ट्रेनचे तीनही प्रकार यांसारख्या अनेक प्रकल्पांतून रेल्वेचे आपले कौशल्य सिद्ध करून दाखवले आहे. आता तर डबलडेकर ट्रेनच्या स्वरुपाचा वापर करून वरती पॅसेंजर आणि खालील बाजूस पार्सल अशा प्रकारच्या प्रोटोटाइपवर भारतीय रेल्वे काम करत आहे. यामुळे एकाच डब्यातून प्रवासी आणि मालवाहतूक करणे शक्य होईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर मालवाहतुकीला अधिक गती प्राप्त होऊन भारतीय रेल्वेसाठी हा मैलाचा दगड ठरू शकेल. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी अशक्य काही नाही, गरज आहे ती केवळ राजकीय इच्छाशक्तीची.
वंदे भारत ट्रेन देशाचे भविष्य करणे भारतीय रेल्वेला शक्य
- भारतीय रेल्वेने आपला पूर्ण भर आणि लक्ष केवळ वंदे भारत ट्रेनवर केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाकी ट्रेनसेवा, प्रकल्प काहीसे 'सायडिंग'ला गेल्याचे चित्र आहे. तसे नसले तरी त्याचा वेग अतिशय धीमा असल्याचे दिसत आहे. वंदे भारत चेअर कार ट्रेन प्रचंड यशस्वी झाली आहे. आता वंदे भारत स्लीपर ट्रेनही लवकरच भारतीय ट्रॅकवर दिसेल. परंतु, हे दोन्ही प्रकार एसी ट्रेन स्वरुपात आहेत. याच वंदे भारत ट्रेनच्या बनावटीत काही बदल करून हीच ट्रेन नॉन एसी प्रकारात तयार केल्यास रेल्वेसाठी ‘सबकुछ वंदे भारत’ प्रयोग यशस्वी करून दाखवता येईल. त्यामुळे अमृत भारत ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांना जी पाने पुसली जात आहेत, त्यातही बदल होऊन खऱ्या अर्थाने वंदे भारत ट्रेन प्रवासाचा आनंद रेल्वे प्रवासी घेऊ शकतील. त्यासाठी प्रवाशांना कोणत्याही प्रकारे प्रवासाच्या आनंदासाठी जुळवून घ्यावे लागणार नाही. वंदे भारत ट्रेन नॉन एसी स्वरुपात आणल्यास भारतीय रेल्वेला आताच्या घडीला एक्स्प्रेस ट्रेन जशा चालवल्या जातात, अगदी त्याच प्रकारात वंदे भारत ट्रेन चालवणे शक्य होऊ शकेल. म्हणजेच वंदे भारत बनावटीचीच ट्रेन परंतु त्याची रचना वंदे भारतचेच काही नॉन एसी डबे आणि एसी डबे अशी करता येऊ शकेल. उदा. सामान्य एक्सप्रेसमध्ये जसे नॉन एसी स्लीपर, ३ टियर एसी, २ टियर एसी आणि फस्ट क्लास एसी ट्रेन अशी संरचना असते. अगदी हीच संरचना कायम ठेवून वंदे भारत ट्रेन एक्सप्रेस स्वरुपात चालवता येऊ शकेल. भारतीय रेल्वेसाठी हे अगदीच शक्य आहे. यावर रेल्वेने अगदी प्रामाणिकपणे विचार करत LHB डबे कालबाह्य करून ‘सबकुछ वंदे भारत’ ट्रेन करावे, असे मनापासून वाटते.
- जाता जाता: अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक लोक भारतीय वारसा, विरासत यांवर भरभरून बोलत असतात. परंतु, भारतीय रेल्वेच्या बाबतीत तीच गोष्ट लागू करण्याची मोठी संधी असताना ते प्रत्यक्षात घडताना दिसत नाही, याची मोठी खंत वाटते. याचे उदाहरण म्हणजे फ्लाइंग राणी आणि वलसाड पॅसेंजर. सुरुवातीला सिंहगड एक्सप्रेस आयसीएफ डबलडेकर बनावटीच्या डब्यात सुरू करण्यात आली आणि प्रवाशांना याची भुरळ पडली. यानंतर फ्लाइंग राणी आणि वलसाड पॅसेंजर या ट्रेन नॉन एसी डबलडेकर डबे स्वरुपात चालवल्या जाऊ लागल्या. आयसीएफने तयार केलेल्या डबलडेकर नॉन एसी ट्रेनला प्रवाशांनी मोठी पसंती दिली. परंतु, आता नॉन एसी डबलडेकर ट्रेन कालबाह्य झाली आहे. कारण, आयसीएफ डबलडेकर नॉन एसी डब्यांचे आयुर्मान संपल्यामुळे या दोन्ही ट्रेन LHB बनावटीच्या साध्या डब्यांच्या रचनेसह चालवल्या जात आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात असलेला हा युनिकनेस जपण्याची सुवर्णसंधी रेल्वेने घालवली असेच म्हणावे लागेल. अगदी मोठ्या थाटात सुरू केलेल्या डबलडेकर एसी ट्रेनची अवस्थाही फार मोठी चांगली नाही. रेल्वेकडे सगळ्या गोष्टी आहेत. केवळ काही बदल करून LHB बनावटीचे डबलडेकर ट्रेनचे डबे नॉन एसी प्रकारात कन्व्हर्ट करणे रेल्वेला अशक्य नाही. या दोन्ही ट्रेनचा युनिकनेस कायम ठेवण्यासाठी भारतीय रेल्वेला LHB बनावटीचे डबलडेकर नॉन एसी प्रकारातील जास्तीत जास्त ५० डबे तयार करावे लागले असते. LHB बनावटीचे एसी डबे तयारच आहेत, केवळ त्याचेच नॉन एसी स्वरुप तयार करून हाच वारसा रेल्वेला अगदी अभिमानाने जपता आला असता. परंतु, तसे घडताना दिसले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. रेल्वेने ही सुवर्ण संधी घ्यावी, प्रवाशांना आणि देशाला सुखद धक्का द्यावा.
- देवेश फडके.