मुंबई विद्यापीठातील सिनेटची निवडणूक अचानक रद्द करण्यात आल्याने आज मुंबईतील राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, आजचा दिवस, लोकशाहीसाठी घातक होता, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच अशा प्रकारे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यास लोक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.
सिनेटच्या निवडणुका रद्द करण्याच्या विद्यापीठाने केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले की, गेले 18 तास राज्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप भयानक होते. सिनेट निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असे जाहीर झाले. त्यानंतर ड्राफ्ट आला. मात्र आता काही तास आधी पत्र काढून, निवडणूक स्थगित केली गेली. मला, आज राज्यपालांची भेटण्यासाठी वेळ भेटली नाही. मात्र मी त्यांना पत्र दिले आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाने स्थगिती दिल्यावर कसे काय फॉर्म कसे स्वीकारले जातात, हे मला कळत नाही. आजचा दिवस हा लोकशाहीसाठी घातक होता. त्सुनामी किंवा भूकंप झाल्यावरच असा निर्णय घेता येतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी अमित ठाकरे यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, बोसग मतदार शोधण्यासाठी दोन महिने लागतात का? अजून आम्ही तुम्हाला एक महिना वेळ देतो. मग निवडणूक जाहीर करा. तुम्ही नेमके कोणाला घाबरत आहात. आम्हाला घाबरत असाल तर आमची ताकद वाढत आहे. लोकसभा, विधानसभा पुढे गेल्यावर लोक रस्त्यावर उतरतील, हे पाहा, असा इशाराही त्यांनी दिला.