स्वेच्छेने दिला, तर हुंडा घेण्यात गैर काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 06:46 AM2019-01-13T06:46:00+5:302019-01-13T06:46:40+5:30
७० टक्के मुलांची मानसिकता : विधि प्राधिकरणाच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
- इंदूमती गणेश
कोल्हापूर : मुलीचे पालक स्वेच्छेने वराला हुंडा द्यायला तयार असतील, तर ते घेण्यात नव्या पिढीला काहीच गैर वाटत नाही. मुलींवर अन्याय, अत्याचार होण्याला त्यांची वेशभूषा आणि वागणे कारणीभूत असते, असा निष्कर्ष जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण व आरती फौंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आला आहे. यासंबंधीचा अहवाल उच्च न्यायालयास सादर करण्यात येणार आहे.
संवाद कायदा ज्ञानयात्रेअंतर्गत एक महिना १२ दिवसांत २६ शाळा, २१ महाविद्यालये व दोन अन्य संस्था अशा ४९ आस्थापनांमध्ये सुमारे २० हजार मुला-मुलींशी संवाद साधण्यात आला. या वेळी भरण्यात आलेल्या १० हजार प्रश्नावलीतून हे निष्कर्ष काढण्यात आले. चर्चेदरम्यान लैंगिक भाव, मुलामुलींमधील आकर्षण, त्यांच्यावर विशेषत: लहान मुला-मुलींवरील अत्याचार, पोक्सो कायदा, लिंगभेदांमागील मानसिकता याची माहिती दिली जाते. शिवाय या दरम्यान काही प्रकरणे उघडकीस आली की, त्यांना आधार देऊन दोषींवर कायदेशीर कारवाईही केली आहे.
जोडीदार म्हणून स्वीकारा
मुलीचे लग्न ही पालकांसाठी फार मोठी बाब असते. ते तिच्या शिक्षणाऐवजी विवाहासाठी दागिने, मानपान, वस्तू देण्यासाठी पैसा जमवून ठेवतात. त्यामागे तिचा सासरी छळ होऊ नये, हे एकमेव कारण असते. मुलीला आयुष्याचा जोडीदार, सुख-दु:खातील सहचारिणी म्हणून स्वीकारले पाहिजे, असे समन्वयक संवाद यात्रा ज्योती भालकर यांनी सांगितले.
७० टक्के मुलांना हुंडा घेण्यात गैर वाटत नाही, ही शोकांतिका आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार दर तीन ते चार मिनिटाला महिला व मुलींवर अत्याचार होतात. हे बदलण्यासाठी स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलायला हवी.
- न्या. उमेशचंद्र मोरे
(सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण)