मुंबई : तोडा, फोडा आणि राज्य करा ही इंग्रजनीती आजमावली जात आहे. त्यामुळे स्वातंत्र्य राखण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. अन्यथा स्वकीयांकडूनच आपल्यावर गुलामगिरी लादली जाईल. आपली एकजूट हीच आपल्या स्वातंत्र्याचे कवच असेल, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथील कार्यक्रमात उत्तर भारतीयांना साद घातली.
शिवसेनेने कायम माणुसकी जपली आहे. पण आज फोडाफोडीचे राजकारण करून देशाला बदनाम केले जात आहे. पाच वर्षे आपण एकत्र असतो मग निवडणुकीच्याच वेळी वेगळे का होतो, असा सवाल करीत तुमची साथ मागायला आणि डोळे उघडायला आलो आहे. लवकरच समविचारी उत्तर भारतीयांसह मुस्लिम, गुजराती आणि ख्रिश्चनांचा मेळावा घेणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले, ‘आज चांगला मुहूर्त आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणारे ॲमेझॉनच्या पार्सलने माघारी जात आहे.’ काँग्रेससोबत जाण्यास भाग पाडले. आमची २५ वर्षांची युती होती, त्यात आम्हाला काय मिळाले? २०१४ पूर्वीच भाजपने युती तोडली. आम्हाला काँग्रेससोबत जाण्यास आम्हाला भाग पाडले गेले, असे ठाकरे म्हणाले.