मुंबई : राज्य, शहर, परिसर आणि स्वत:साठी आपल्या राज्यासाठी काय हवे, हे ठरवायला हवेय. महाराष्ट्राचा अभिमान लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा राजवटीत तुमचे उज्ज्वल भविष्य घडेल, असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत मौल्यवान आहे आणि या मतावर भविष्य अवलंबून आहे. सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल, असे आवाहन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहून केले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी लिहिलेले पत्र एक्सवर पोस्ट केले. हे आपले वर्ष आहे! आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवे. भारताच्या लोकशाही मुल्यांचे आणि संविधानाच्या कायदेशीर बाबींचाच वापर करून खच्चीकरण केले जातेय.
लोकशाहीच्या रक्षणासाठी असलेल्या संस्थांचा वापर ती संपवण्यासाठी केला जातोय. लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेले नाही. जे काही केले गेले ते केवळ मोजक्या लोकांसाठी, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
नया है वह : आशिष शेलारयुवराजांचे पत्र वाचून मुंबईकरांना हसावे की रडावे, असे झाले असेल. ज्यांना संजय राऊत यांनी सांगितलेलाच इतिहास, भूगोल माहिती आहे, अशा युवराजांनी भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानाबद्दल बोलू नये. कुमार वयात केलेले हे भाष्य समजून ते सोडून द्या. नया है वह! अशी टीका भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.