मुंबई - विरोधकांना घाबरविण्यासाठी भाजपाकडून सरकारी यंत्रणेचा वापर करण्यात येतो, अनेकांच्या मागे चौकशी लावली जाते असं आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. जर सरकारी यंत्रणाचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे बडे नेते आज भाजपमध्ये असते असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी माझा'ला या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनसे आता उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे तर महाराष्ट्रात जातीयवाद पसरवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.
जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते भाजपमध्ये असते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता असं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं. ईडी आणि सीबीआय या स्वायस्त संस्थांचा वापर सत्ताधारी भाजपाकडून केला जातो असा आरोप नेहमीच विरोधक करतात. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलं आहे.
शिवसेना-भाजपमध्ये अनेक कुरबुरी झाल्या, कलगीतुरे रंगले, मात्र विकासाच्या मुद्द्यावर कायमच एकमत झालं. शिवसेनेसोबत टोकाचे मतभेद होते, मात्र कधीच एकमेकांपासून दूर गेलो नाही, शिवसेनेच्या दबावामुळे किरीट सोमय्यांचं तिकीट कापलं नाही, दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला, शिवसेनेतून जे पदाधिकारी विरोध करत होते त्यांना माझ्या पक्षातील निर्णय मी घेईन असं ठणकावून सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपाच्या संकल्पपत्रावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकरी, गरीब आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठीचे भाजपाचे संकल्पपत्र आहे. अतिशय संवेदनशीलतेने प्रत्येक घटकाचा विचार यात करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाच्या सर्व नेत्यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी मांडले