मुंबई : मी, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. वाय बी. चव्हाण सेंटरला पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. दरम्यान, त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. वाय बी. चव्हाण सेंटरमध्ये वि. का. राजवाडे संशोधन मंडळ ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. यावेळी सहा ऐतिहासिक ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार एकाच कार्यक्रमात उपस्थित होते.
या सोहळ्यात शरद पवार म्हणाले, राज्य सरकारशी बोलणे सध्या जरा अडचणीचे आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघाला की, राज्य सरकारला मदत करणे भाग पडेल. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मीसुद्धा आहे. आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये बदल होईल. हे विशेष वेगळे सांगायची गरज नाही. तसेच, राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्था आणि त्यांच्याकडील खजिना जतन केला पाहिजे. त्यासाठी सरकारने या संस्थांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. तसेच, अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आहे. काही पुस्तक वाचली. काही पुस्तकं चाळली. ही पुस्तकं अभ्यासपूर्ण लिहिली गेलेली आहेत, असे शरद पवार म्हणाले.
याचबरोबर, या सोहळ्यात शरद पवार यांनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, मी राज्याचा प्रमुख होतो. त्यावेळी कर्नाटकता गेलो होतो. तिथं शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी यांच्या राज्यात एक प्रशस्त ग्रंथालय होते. त्याठिकाणी मोडी भाषेत शिवाजी महाराज यांच्याबद्दल बरीच पुस्तक लिहिली होती. ते सर्व पाहून राज्यात परत आलो. पाच तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. त्यांनी कर्नाटकातील ग्रंथालयात पाठवले. तिथल्या ग्रंथांचे मराठीत भाषांतर करण्याचे काम दिले होते. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा इतिहास अधिक समृद्ध करण्यास मदत झाली असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.