शेती अन् शेतकरी वाचवायचा असेल, तर नुसते धडे देऊन कसे चालेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:26 AM2023-05-01T10:26:25+5:302023-05-01T10:26:43+5:30
तज्ज्ञांची नेमली समिती, भ्यासाचा आराखडा तयार करताना विद्यार्थ्यांना त्यांच्यात या विषयाबाबत रुची कशी निर्माण होईल, याची काळजीही घेण्यात येणार आहे.
मुंबई - शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागाने स्वीकारला असून, अभ्यासाचा आराखडा तयार करण्यासाठी लवकरच तज्ज्ञांची समिती नेमून तो निश्चित करण्यात येणार आहे.
शालेय अभ्यासक्रमात आता शेतीचे धडे
शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्त्व, उपाययोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होणार आहे. अभ्यासाचा आराखडा तयार करताना विद्यार्थ्यांना त्यांच्यात या विषयाबाबत रुची कशी निर्माण होईल, याची काळजीही घेण्यात येणार आहे.
शेतीसमोर आव्हाने काय?
शेती पाण्यावर अवलंबून आहे, पाण्यासाठी सर्व पावसावर अवलंबून आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड केली जाते. शेतकरी पावसावर किंवा पाण्याच्या सरकारी योजनांवर अवलंबून आहे. शेती गुंतवणुकीतील मोठा खर्च हा या खतांवर होत असतो. या खतांची उपलब्धताच शेती उत्पादनावर परिणाम करते. पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसलेली खते शेतीचे उत्पादन घटवितात. शेती पंपांना पुरेसा वीजपुरवठा नाही. भारनियमनामुळे दिवसातील बहुतांश वेळ विहिरीतील पाणी शेतीला देता येत नाही, अनेक वर्षे उपाययोजना होऊ शकलेली नाही. शेतमालाची किंमत शेतकरी ठरवत नाही. बाजारात आलेल्या मालाच्या उपलब्धतेनुसार मालाची किंमत ठरविली जाते. त्यामुळे उत्पादन खर्च कितीही असो, माल हमीभावाप्रमाणेच विकावा लागतो. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत सरकार शेतमालाचा साठा करण्यावर निर्बंध लावू शकते.
प्रत्यक्ष शेतीच्या कामांचेही प्रशिक्षण
केवळ पाठ्यपुस्तकापुरता हा विषय मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे कृषी पर्यटन वा वर्षातून एकदा शेतीच्या कामांचा अनुभव घेण्याची संधी मिळावी, असेही मत शिक्षण तज्ज्ञांसह पालकांनी मांडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शेती व शेतकऱ्याच्या कामांची ओळख होऊन या क्षेत्राविषयी आपुलकी निर्माण होईल.
कृषी विभाग साहित्य पुरविणार
शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व समजू शकेल. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते कृषी विभागाकडून पुरविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.