मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवात डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत प्रतीक्षा करा, मात्र मंडळांची सहमती असेल तर गणेशोत्सवात खुशाल डीजे वाजवा, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालकांनी सोमवारी राज यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ऐन सणासुदीच्या काळात मोठी मागणी असलेल्या डीजेवर बंदी घातल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे मालकांनी ठाकरे यांना सांगितले. याप्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी विनंतीही डीजे मालकांनी त्यांच्याकडे केली. डीजेमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होते. उत्सवांमधील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणी होईपर्यंत प्रतीक्षा करा, असे ठाकरे म्हणाले.
मंडळांची तयारी असेल तर खुशाल डीजे वाजवा- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:40 AM