केंद्रावर उशिरा पोहोचल्यास परीक्षा देता येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:50 AM2019-04-20T05:50:28+5:302019-04-20T05:50:37+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावीनंतर विधि (लॉ) शाखेच्या पाच वर्षे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या रविवारी, २१ एप्रिलला सीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावीनंतर विधि (लॉ) शाखेच्या पाच वर्षे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या रविवारी, २१ एप्रिलला सीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ३६ तर महाराष्ट्राबाहेरील १३ शहरांत मिळून एकूण ७७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे, उशीर झाल्यास कोणत्याही परिस्थितीत वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
देशभरातून २० हजार २७२ विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली. यामध्ये महाराष्ट्रातून जवळपास १२ हजार तर महाराष्टÑाबाहेरील ८ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी स्वत:सोबत ओळखीच्या पुराव्यासाठी प्रवेशपत्रावरील उल्लेख असलेले मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे. उशिरा आल्यास त्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.