Join us

वेटिंगच्या तिकिटावर आरक्षित डब्यात चढलात तर खाली उतरवणार; दीड लाख प्रवाशांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 10:20 AM

वेटिंगवरील तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने २० जूनपासून  कारवाई सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या महिन्याभरात तिकीट कन्फर्म नसतानाही (वेटिंग) आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या दीड लाखांहून अधिक प्रवाशांना मेल-एक्स्प्रेस गाड्यांतून खाली उतरवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.   

वेटिंगवरील तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने २० जूनपासून  कारवाई सुरू केली. त्यानुसार, पहिल्या दिवशी २९ मेल/एक्स्प्रेसमधून सुमारे १,७०० प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला नव्हता. गणेशोत्सवाच्या काळातही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. 

दीड महिन्यापूर्वी सोशल मीडियावरून रेल्वेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. आरक्षित डब्यांत वेटिंग तिकिटावर प्रवास करणारे प्रवासी डब्याच्या मार्गिकेत बसतात, तसेच लगेजही ठेवतात. शौचालयाशेजारी उभे राहतात. त्यामुळे आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना त्रास होतो. जागेवरून उठणेही कठीण होते इत्यादी तक्रारी रेल्वेकडे आल्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आली.

उपनगरी लोकलचे प्रवासीही आरक्षित डब्यांतून कल्याण, कर्जत, कसाऱ्यापर्यंत प्रवास करतात. तिकीट खिडकीवर काढलेल्या वेटिंगवरील तिकिटावरही अनेक प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. त्यांना टीसीही प्रवास करू देतात. मात्र या तिकिटावरही आरक्षित डब्यातून प्रवास करता येत नाही.  जनरल डब्याच्या तिकिटावरही अनेक प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. त्यांच्याकडून दंड वसूल करून प्रवास करू दिला जातो. त्यांच्यामुळे आरक्षित डब्यातील गर्दी वाढते. या तिकिटावरही आरक्षित डब्यातून प्रवास करता येत नाही, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींनी तिकीट काढले आणि त्यापैकी चार जणांना कन्फर्म तिकीट मिळाले तर वेटिंगवर असलेले दोघेही चार जणांसह प्रवास देतात. परिणामी, अन्य प्रवाशांची गैरसोय होते.  

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे