आता जर फोन केला, तर मतदानच करणार नाही; राजकीय पक्षांच्या टेलिकाॅलिंगमुळे मतदारांमध्ये तीव्र संताप
By स्नेहा मोरे | Published: March 30, 2024 08:09 AM2024-03-30T08:09:04+5:302024-03-30T08:09:31+5:30
निवडणुका जाहीर होताच, वेगवेगळ्या उमेदवारांनी टेलिकाॅलिंगच्या माध्यमातून मतदारांना त्रस्त करणे सुरु केले आहे.
मुंबई : हॅलो, तुमच्या मतदारसंघातील अमक्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात का? पंतप्रधानपदी तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? राज्यात कोणत्या पक्षाला तुम्ही सर्वाधिक पसंती द्याल?.... अशी विचारणार करणाऱ्या फोनमुळे मतदार पुरते संतापले आहेत. आता जर फोन केला तर, मतदानच करणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रीया फोन करणाऱ्यांना ऐकाव्या लागत आहेत.
निवडणुका जाहीर होताच, वेगवेगळ्या उमेदवारांनी टेलिकाॅलिंगच्या माध्यमातून मतदारांना त्रस्त करणे सुरु केले आहे. पारंपरिक प्रचाराबरोबरच सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियावरील प्रचाराला प्राधान्य दिले आहे. मतदारांना थेट संपर्क साधून मते जाणून घेण्याची टेलिकॉलिंग पद्धतही अंमलात आणली जात आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या मीडिया वॉर रूममध्ये खास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यात विशेषत: कॉलेजात जाणाऱ्या मुला-मुलींना काम देण्यात आले आहे.
स्वरूप कसे?
पक्षाच्या मीडिया वॉररूममध्ये मतदार संघनिहाय, जिल्हा निहाय, उमेदवारनिहाय अशा वेगवेगळ्या स्वरुपात टेलिकाॅलिंगसाठी तरुणांची भरती केली जाते.
पदवीधारक असण्याबरोबरच मराठी आणि हिंदी या भाषांचे उत्तम ज्ञान असणे या आवश्यक अटी आहेत.
दिवसाला साधारणतः १५०-२०० काॅल्स करणे आणि ९-१० तासांची कार्यालयीन उपस्थिती, अशीही अट आहे.
साधारणत: महिना-दीड महिन्यांच्या या कामासाठी १२ ते १५ हजार रुपयांचे वेतन दिले जात आहे.
या मुलांना मतदारांची संपर्क यादी देण्यात येते. त्या मतदारसंघातील उमेदवार, चिन्ह, विकासकामे, आश्वासनांबद्दल संपूर्णतः माहिती देऊन मत देण्याचे आवाहन करण्यात येते.
ज्या मतदारांशी काही कारणास्तव संपर्क होत नाही त्यांचा पुन्हा पाठपुरावा केला जातो, त्यांना पक्ष, उमेदवार आणि चिन्हाची वारंवार आठवण करून दिली जाते.
डेटा महत्त्वाचा
काही राजकीय पक्षांकडे टेलिकॉलिंग टीम आधीपासूनच आहे. त्यामुळे या पक्षांना मतदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचे संकलन करत कल तपासणी करणे सोपे जाते.
केवळ निवडणुकीसाठी नव्हे तर त्यापूर्वीपासून नियमित पद्धतीने पक्षाचे उपक्रम, कार्यक्रम, मोहीम, अभियान याविषयी सतत काॅल करून माहिती दिली जात असल्याने ठराविक पक्ष उमेदवाराविषयी मतदार जागरूक राहतात.
वर्षभरापूर्वीपासून ही टीम सातत्याने काॅल करण्याचे काम करत असल्याने येथील डेटा हा कल तपासणीसाठी महत्त्वाचा ठरतो.