...तर मुख्यमंत्र्यांना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 01:24 PM2018-03-26T13:24:44+5:302018-03-26T13:24:44+5:30
राज्यभरातून विविध संघटनांचे कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत.
मुंबई: सरकारला संभाजी भिडे यांना अटक करता येत नसेल तर त्यांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली.
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक व्हावी, या मागणीसाठी सोमवारी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातून विविध संघटनांचे कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी सरकार संभाजी भिडे यांना अटक का करत नाही, असा सवाल विचारला. भिडे गुरूजी यांना अटक न होण्याच्या षडयंत्रात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा संशय घेण्यास वाव आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांना अटक होत नाही तर देवेंद्र फडणवीस यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली.
नुकतीच मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडली होती. संभाजी ब्रिगेडमधून एक गट बाहेर पडला आहे. या नव्या गटाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड असणार आहेत. मात्र, नव्या गटाने संभाजी ब्रिगेड असे नाव वापरू नये, असा इशारा विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेड मुळात एक सामाजिक संघटना होती. प्रवीण गायकवाड आधी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष होते.पण नंतर अंतर्गत धुसफुसीमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढे मनोज आखरे या नव्या अध्यक्षांनी ब्रिगेडची नोंद राजकीय पक्ष म्हणून केली. काही काळ शेकापमध्ये गेल्यानंतर मनोज गायकवाड यांनी पुन्हा संभाजी ब्रिगेडचा सामाजिक संघटना म्हणून झेंडा हाती घेतला आहे.