'कारभार सांभाळता येत नसेल तर मुंबई विद्यापीठ बंद करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:37 AM2018-10-27T04:37:23+5:302018-10-27T04:38:45+5:30
विधि अभ्यासक्रमासाठी ६०:४० पॅटर्न लागू करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने विद्यापीठाला फैलावर घेतले.
मुंबई : विधि अभ्यासक्रमासाठी ६०:४० पॅटर्न लागू करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने विद्यापीठाला फैलावर घेतले. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ५३ विधि महाविद्यालयांमध्ये केवळ ४७ पूर्ण वेळ प्राध्यापक असल्याचे निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयाने विद्यापीठाला खडेबोल सुनावले. ‘कारभार सांभाळता येत नसेल तर विद्यापीठ बंद करा,’ अशा शब्दांत न्यायालयाने विद्यापीठाला सुनावले.
तीन वर्षे विधि अभ्यासक्रमाची पहिली दोन वर्षे आणि पाच वर्षे विधि अभ्यासक्रमाची पहिल्या चार वर्षांची परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेऊन ६०:४० पद्धतीने गुण देण्यात यावेत, असा निर्णय मुंबई विद्यापीठाने मे महिन्यात घेतला. या निर्णयाला प्राध्यापक दीपक चट्टोपाध्याय, जी.जे. अडवाणी महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थसारथी सराफ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.
दरम्यान, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाने विद्यापीठाने आपल्याला या निर्णयाची
माहिती दिली नसल्याचे न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाने या पॅटर्नला दिलेली स्थगिती सोमवारपर्यंत कायम
राहील.
>केवळ ४७ प्राध्यापक पूर्ण वेळ सेवेत
शुक्रवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ५३ विधि महाविद्यालयांमध्ये ३५० प्राध्यापक असून त्यात केवळ ४७ प्राध्यापक पूर्ण वेळ सेवेत असल्याची माहिती न्यायालयाला दिली.
उर्वरित प्राध्यापक हे वकील असून ते या महाविद्यालयांत पार्ट-टाइम काम करत आहेत. त्यामुळे ४७ प्राध्यापकांना एवढ्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे अशक्य आहे, अशी माहिती अॅड. वारुंजीकर यांनी न्यायालयाला दिली.त्या वेळी न्यायालयानेही आश्चर्य व्यक्त केले. ‘कारभार सांभाळता येत नसेल तर विद्यापीठ बंद करा,’ असे न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला सुनावले.६०:४० पॅटर्ननुसार, विद्यार्थ्यांना ४० गुणांचे प्रकल्प असणार आणि त्याचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार. तर ६० गुणांचा लेखी पेपर असणार.