मुंबई/नाशिक - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा दर कोसळतील ही भीती व्यापारी आणि शेतकऱ्यांना असल्याने बेमुदत संप पुकारला आहे. ही संपाची कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार- केंद्राशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी अजबच सल्ला दिला. परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असेच भुसे यांनी म्हटले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाहीत, याची काळजी सरकारच्यावतीने घेतली जाईल. कांद्याची अडचण अशी आहे की तो जास्त दिवस टिकवता येत नाही. त्याच्यावर प्रक्रिया करुन टिकवण्यासाठीचा जो खर्च येतो, त्यामध्ये तो भागत नाही. म्हणून, मला वाटतं उद्या कांदा २५ रुपयावर गेला तर, ज्याला परवडत नाही, त्याने महिना-२ महिने कांदा खाल्ला नाही तर कुठे बिघडतंय, असे म्हणत माजी कृषीमंत्री आणि विद्यमान मंत्री दादा भुसे यांनी काद्यावरील निर्यादबंदीच्या निर्णायावर भाष्य केलं आहे.
राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संताप झाल्याचे पाहायला मिळत आहे तर यानिर्णयाविरोधात कांदा उत्पादक अग्रेसर असलेला नाशिक जिल्हा येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भाष्य करताना, शिंदे सरकारमधील नेत्यानं अजबच वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असे दादा भुसे यांनी म्हटलं. जर २५ रुपये किलोवर कांदा गेला आणि परवडत नसेल तर दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं? असा सवालही त्यांनी केला आहे.
नागरिकांचीही ती भावना असायला हवी
कांदा प्रश्न सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाठीमागे कांद्याचे दर 300 ते 400 पर्यंत खाली आले होते. त्यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आताही नागरिकांना देखील कांदा मुबलक उपलब्ध होईल, आणि शेतकऱ्यांना देखील दोन पैसे मिळतील. असा तोडगा काढला जाईल. लवकरच चर्चा करून मार्ग काढू, तसेच सर्व व्यवहार सुरळीत होतील यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे भुसे यांनी सांगितले. कांद्याचे दर पडल्यावर दर वाढण्यासाठी नाफेडने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आताची कोंडी सोडविण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी समन्वय साधून निर्णय घेवू. शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही शेतकऱ्यांच्या घामाला देखील दाम मिळायला हवे, ही भावना नागरिकांची देखील असायला हवी, असेही भुसे यांनी सांगितले.