मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक व मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे हे एका कार्यक्रमात केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने दहिसर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सुर्वे यांनी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दहिसरच्या कोकणीपाडा बुद्धविहार येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधून चिथावणीखोर व प्रक्षोभक भाषण केल्याचा तक्रारदार व शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांचा आरोप आहे. पाटेकर यांनी त्या कार्यक्रमाची फेसबुक लाइव्ह लिंकदेखील शेअर केली आहे. शशांक पांडे या फेसबुक अकाउंटवरून ते लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.
सुर्वे यांच्या त्या भाषणात ठोकून काढा, कापून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो. कोथळा काढल्याशिवाय सोडणार नाही, अशा चिथावणीखोर वाक्यांचा समावेश आहे. या सगळ्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगदेखील पाटेकर यांनी पोलिसांना दिले आहे. सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी, अशी विनंती उदेश पाटेकर यांनी पोलिसांना केली आहे.