जादा भाडे आकाराल, तर तुमची खैर नाही! परिवहन आयुक्तांची तंबी; राज्यात अवैध प्रवासी वाहतूक तपासणी
By नितीन जगताप | Published: May 17, 2023 01:38 PM2023-05-17T13:38:44+5:302023-05-17T13:39:26+5:30
खासगी प्रवासी वाहनांच्या मालकांनी भाडे तक्ता व प्रती आसन दर थांब्यावर प्रदर्शित करावेत. प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकदेखील प्रदर्शित करावे लागणार आहेत.
मुंबई : उन्हाळी सुट्या सुरू झाल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसवर प्रवाशांचा वाढणारा ताण लक्षात घेता, खासगी बस चालकांकडून दुप्पट ते तिप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’मध्ये ‘सुट्यांचा आनंद घ्यावा कसा? प्रवासावर रिकामा होतोय खिसा’ या मथळ्याचे वृत्त १३ मे २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बस मालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
परिवहन आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे की, खासगी कंत्राटी प्रवासी बस चालकांकडून जादा भाडे आकारण्यात येत असल्याचे, तसेच खासगी प्रवासी बसला आग लागणे, अपघात होण्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी व सुरक्षाविषयत दृष्टिकोनातून सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी १६ मे ते ३० जून २०२३ या कालावधीत खासगी कंत्राटी प्रवासी बसची तपासणी मोहीम राबवावी, असे आदेशात म्हटले आहे.
हेल्पलाइन क्रमांक द्यावा लागणार
खासगी प्रवासी वाहनांच्या मालकांनी भाडे तक्ता व प्रती आसन दर थांब्यावर प्रदर्शित करावेत. प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकदेखील प्रदर्शित करावे लागणार आहेत.
यावर असेल परिवहन विभागाची नजर
(१) विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, (२) टप्पा वाहतूक, (३) प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक, (४) योग्यता प्रमाणपत्र, (५) रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर इत्यादींची तपासणी, (६) वाहनामध्ये बेकायदा केलेले फेरबदल, (७) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, (८) मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे (९) जादा भाडे आकारणे, (१०) अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे (११) आपत्कालीन बाहेर पडण्याचे दार आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत का?
खासगी वाहतुकीसाठी एसटीच्या त्या-त्या संवर्गातील भाड्यापेक्षा ५० टक्क्यांहून अधिक असणार नाही, असे कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे. जास्त भाडे आकारणाऱ्या बसची तपासणी करून दोषी वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
-विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त
परिवहन कार्यालयासाठी...
ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय केल्याबाबत स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी लागणार आहे. खासगी बस वाहतूकदारांच्या ठिकठिकाणच्या बुकिंग कार्यालयांना भेटी देऊन, ऑनलाइन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील त्यांच्या संगणकावरून तपासून पहिला जाणार आहे. ऑफलाइन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील तपासण्यात येणार आहे. भाडे आकारणीबाबत प्रवाशांकडून खात्री केली जाणार आहे.