घरातील टाक्या साफ करता, मग बिल्डिंगची टाकी कुणी करायची?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:05 PM2023-09-05T12:05:26+5:302023-09-05T12:05:39+5:30
पालिकेचे म्हणणे आहे की, वर्षातून दोनवेळा धुतल्या गेल्या पाहिजेत
- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईतल्या इमारतींच्या गच्चीवर आणि भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाक्या वर्षांतून दोनवेळा स्वच्छ करण्याचे आवाहन महापालिकेकसह गृहनिर्माण तज्ज्ञांकडून केले जात असतानाच दुसरीकडे मात्र गृहनिर्माण संस्थांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न बिकट होण्यापूर्वीच गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनीही महापालिकेच्या आवाहनाची वाट न पाहता, घरातल्या पाण्याच्या टाकीप्रमाणेच इमारतीच्या टाकीचीही निगा राखावी; याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
मुंबईत नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था ४० ते ४५ हजार आहेत. नोंदणी झालेली नाही, अशाही अनेक संस्था आहेत. पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेबाबत महापालिका नोटीस देते. मात्र पाण्याची टाकी साफ करण्याची जबाबदारी सोसायट्याच्या पदाधिकाऱ्यांची असते. वर्षातून दोन ते तीन वेळा पाण्याची टाकी साफ करून घेतली पाहिजे. पावसाळ्यात पाणी खराब येते. टाकीत खाली गाळ साचलेला असतो. क्लिनिंग एजन्सीकडून टाक्या साफ करून घेतल्या पाहिजेत. सोबत लोखंडी पाइपलाइन व्यवस्थित करून घेतल्या पाहिजेत.
- डॉ. सुरेंद्र मोरे, गृहनिर्माण अभ्यासक
सरकारी यंत्रणा केवळ आदेश काढते. मात्र, आदेशाचे पालन होते की नाही हे तपासले जात नाही. इमारतींच्या टाक्या या १५ हजार लीटरहून अधिक क्षमतेच्या असतात. सोसाट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता करून घेतली पाहिजे. महापालिका जशी साथीच्या आजाराबाबत जागृत असते. त्याबाबत पालिकेच्या यंत्रणेने काम केले पाहिजे.
- मिलिंद पांचाळ, महाराष्ट्र सैनिक
स्वच्छ केलेल्या टाकीच्या भिंतीवर, तळावर ब्लिचिंग / क्लोरिनचा वापर करण्यात यावा. त्यानंतर टाकी बंद करून एक तास ठेवण्यात यावी. नंतर स्वच्छ पाण्याचा वापर करून टाकी धुवून घ्यावी. वर्षांतून कमीत कमी दोनवेळा पाण्याची टाकी स्वच्छ किंवा निर्जंतुक करावी.
मुंबईत एकूण नोंदणीकृत असलेल्या गृहनिर्माण संस्थांची संख्या ही ३५ हजारांच्या आसपास आहे. पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी टाक्या साफ करण्याची जबाबदारी ही गृहनिर्माण संस्थांची आहे. गृहनिर्माण संस्थांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या बिल्डिंगची टाकी वर्षातून दोन ते तीनवेळा साफ केलीच पाहिजे. मात्र मुंबई पालिकेनेही गृहनिर्माण संस्थांना या संदर्भातले निर्देश दिले पाहिजेत. आपण जसे इमारतीचे फायर ऑडिट करतो किंवा स्ट्रक्चरल ऑडिट करतो त्याप्रमाणे आपण पाण्याच्या टाक्यादेखील साफ केल्या पाहिजेत. - रमेश प्रभू, गृहनिर्माण तज्ज्ञ