Join us  

सत्तेवर आल्यास सरकारी सेवेचा लाभ देणार!

By admin | Published: October 12, 2014 1:47 AM

राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास लोकांना सरकारी सेवेचा अधिकार देणारा कायदा करण्यात येईल.

जबाबदारी निश्चित करणार : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई : राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास लोकांना सरकारी सेवेचा अधिकार देणारा कायदा करण्यात येईल. सरकारी कार्यालयात लोकांची कामे ठरलेल्या वेळेत करणो त्यामुळे बंधनकारक होईल. वेळेत काम केले नाही, तर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘युथ डिसाईड्स इंडियाज् फ्युचर’ या विषयावरील चर्चेस फडणवीस यांच्यासमवेत युवा वर्गातील लोकप्रिय लेखक चेतन भगत, भाजपाच्या प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन.सी. हे उपस्थित होते.
हम यहाँ डिफरंट टाईप ऑफ पॉलिटिक्स करेंगे, अशी सुरुवात करीत, प्रत्येक सिनेमात राजकारणी लोकच खलनायक म्हणून का दाखवतात, असा सवाल चेतन भगत यांनी फडणवीस यांना केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, राजकारण स्वच्छ करण्याच्या हेतूने मतदान केले तर राजकारणात चांगले लोक पुढे येतील. गेल्या 15 वर्षात राजकारणात पैशाचे महत्त्व वाढले आणि गव्हर्नन्सकडे दुर्लक्ष झाले. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आपण सर्वानीच पुढाकार घ्यायला हवा. हे घडले तर महाराष्ट्र अग्रेसर बनेल.
फडणवीस यांनीही भगत यांना प्रश्न विचारले. लेखणीच्या माध्यमातून तरुणाईशी कसे जोडून घेता, ‘हाफ गर्लफ्रेंड’ हे कादंबरीचे नाव कसे सुचले, अशी प्रश्नांची सरबत्ती भगत यांच्यावर झाली.
 
भगत यांचा उपवास
करवा चौथनिमित्त चेतन भगत यांनी उपवास केल्याचे सिक्रेट देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. त्या वेळी उपस्थित तरुण-तरुणींमध्ये हास्याचे कारंजे उडाले.