होळीसाठी वृक्षतोड कराल तर गुन्हा दाखल होईल, महापालिकेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:24 AM2020-03-07T00:24:13+5:302020-03-07T00:24:18+5:30
सार्वजनिक अथवा खाजगी परिसरातील वृक्ष तोडणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
मुंबई : होळी सणानिमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडले जाण्याची शक्यता आहे. यामुळे पालिका प्रशासनाने उद्यान विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार या विभागातील कर्मचारी डोळ्यांत तेल घालून आपल्या विभागातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मात्र सार्वजनिक अथवा खाजगी परिसरातील वृक्ष तोडणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यामुळे वृक्ष तोडणाºयाला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
सोमवारी होळीचा सण मुंबईत साजरा होत आहे. या सणानिमित्त लाकडे जमा करून होळी तयार करण्यात येते. यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वृक्ष तोडले जात असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पालिकेने कडक पावले उचलण्याची तयारी केली आहे. त्यानुसार सार्वजनिक परिसरातील झाडांसह एखाद्या सोसायटी किंवा खाजगी आवारातील झाड तोडल्याचे किंवा झाड छाटल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिला आहे.
मुंबईत अशी वृक्षतोड होऊ नये यासाठी उद्यान खात्यातील उपउद्यान अधीक्षक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, उद्यान विद्या साहाय्यक यांच्यासह सर्व संबंधित कर्मचारी डोळ्यांत तेल घालून सतर्क आहेत. मात्र अशी बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी नागरिकांनीही याबाबत स्थानिक पोलीस ठाणे किंवा महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान खात्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर ‘१९१६’ क्रमांकावरदेखील तक्रार नोंदविता येणार आहे.
>खावी लागेल तुरुंगाची हवा...
‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५’च्या ‘कलम २१’मधील तरतुदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे, हा अपराध मानला जातो. यासाठी कमीतकमी एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच कमीतकमी एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडदेखील होऊ शकतो.
>मुंबईतील झाडांची माहिती
एकूण झाडे -
२९ लाख ७५ हजार २८३
खाजगी आवारात -
१५ लाख ६३ हजार ७०१
शासकीय परिसर -
११ लाख २५ हजार १८२
रस्त्यांच्या कडेला -
एक लाख ८५ हजार ३३३
उद्यानात - एक लाख एक हजार ६७.